"...तेव्हा बडवे आडवे नाही आले!"; जयंत पाटलांनी पवारांसमोरच भुजबळांना सुनावलं, केला थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 05:24 PM2023-07-05T17:24:14+5:302023-07-05T17:26:03+5:30
"...तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मला दोन लोकांची नावे विचारली होती. शरद पवार यांनी पहिले नाव छगन भुजबळ यांचे घेतले."
पवार साहेबांनी अनेकांना मोठ-मोठ्या संधी दिल्या. पण आता 'विठ्ठलाच्या सभोवताली बडवे आहेत, ते आम्हाला भेटू देत नाहीत', असे ते सांगत आहेत. बडवे जर आडवे येत होते, तर शिवाजी महाराजांच्या साक्षिने शिवतिर्थावर आपण लाखो लोकांच्या साथीने उद्धव ठाकरेंच्या मंत्रीमंडळात शपथ घेतली, तेव्हा बडवे आडवे नाही आले. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मला दोन लोकांची नावे विचारली होती. शरद पवार यांनी पहिले नाव छगन भुजबळ यांचे घेतले. तेव्हा बडवे आडवे नाही आले. अशा शब्दात जयंत पाटील यांनी छगण भुजबळांचा समाचार घेत निशाणा साधला. ते शरद पवार यांनी वाय. बी. चव्हाण सेंटर येथे बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीत बोलत होते.
या महाराष्ट्राला तुम्ही काय उत्तर देणार...?
छगण भुजबळांना फुले पगडीची आठवण करून देत जयंत पाटील म्हणाले, "पवार साहेब, दोन वर्षांचा तुरुंगवास भोगून पुण्याला त्यांचे आगमण झाले. तेव्हा त्यांच्या डोक्यावर फुले पगडी तुम्ही ठेवली होती, आठवतं का बघा. महात्मा फुल्यांच्या विचारांची ती पगडी त्यांच्या डोक्यावर ठेवली, तेव्हा बडवे आडवे आले नाही. त्या पगडी खालील तुमचा डोक्यातून ज्योतिराव फुलेंचा विचार निघून गेला, तुम्ही त्या डोक्यातला फुल्यांचा विचार काढून टाकला आणि ज्यांनी ज्योतीराव फुले आणि सावित्री बाईंची चेष्टा केली त्यांच्या मांडिला मांडी लाऊन बसायला लागलात, या महाराष्ट्राला तुम्ही काय उत्तर देणार हे सांगा?"
राज्यात पक्षांची चोरी करणाऱ्या लोकांचा थयथयाट -
पाटील म्हणाले, "आज राज्यात पक्षांची चोरी करणाऱ्या लोकांचा थयथयाट सुरू आहे. एका पक्षाची चोरी झाली. जो आडवा येतो, तो आम्हाला आवडत नाही. त्याचा पक्षच काढून घेण्याची तयारी आम्ही करतो. शिवसेनेच्या बाबतीत जे झाले, तेच आज राष्ट्रवादीच्या बाबतीत करण्याचा मानस काही लोकांचा आहे. पण राष्ट्रवादी येथे बसलेल्या सर्वांची आहे आणि तेथे गेलेल्या सर्वांनी राष्ट्रवादीसाठी काम केले आहे. आपल्या सर्वांची ही राष्ट्रवादी नामशेश करावी, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून राष्ट्रवादी संपली पाहिजे, अशी भूमिका ठेऊन कुणी काम करत असेल, तर आज सर्वांनी विचार करायला हवा. आजूनही वेळ गेलेली नाही."
शरद पवारांचा झंजावात -
"शरद पवारांचा झंजावात महाराष्ट्रात फिरायला लागला, तर काय परिस्थिती होईल याची छोटीशी चुनूक आपण सातारा आणि कराडमध्ये पाहिली आहे. वय कितीही झाले असले तरी या नेत्याचा संपूर्ण भारतात दरारा आहे," असेही पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना शरद पवार यांच्या सोबत राहण्याची शपथही दिली.