जयंत पाटलांची तब्बल साडेनऊ तास चौकशी; ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 06:33 AM2023-05-23T06:33:58+5:302023-05-23T06:34:17+5:30
ईडीच्या कार्यालयातून चालतच पाटील राष्ट्रवादीच्या कार्यालयात गेले. सोमवारी सकाळी पावणेबाराच्या दरम्यान ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : इन्फ्रास्ट्रक्चर लिझिंग ॲण्ड फायनॅन्शियल सर्व्हिसेस (आयएल ॲण्ड एफएस) या कंपनीत झालेल्या कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सोमवारी ईडीने (सक्तवसुली संचालनालय) साडेनऊ तास चौकशी केली. रात्री साडेनऊच्या सुमारास ते ईडी कार्यालयाबाहेर आले. त्यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घोषणाबाजी करीत होते.
ईडीच्या कार्यालयातून चालतच पाटील राष्ट्रवादीच्या कार्यालयात गेले. सोमवारी सकाळी पावणेबाराच्या दरम्यान ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले. उपलब्ध माहितीनुसार, २००८ ते २०१४ या कालावधीमध्ये आयएल ॲण्ड एफएस समूहातील काही कंपन्यांनी सरकारकडून पायाभूत सुविधांचे काम प्राप्त केले होते आणि ते काम करण्यासाठी उपकंत्राटदार नेमले.
या उपकंत्राटदारांकडून पाटील यांच्या निकटवर्तीयांना काही पैसे मिळाल्याचा आरोप आहे. यावेळी जयंत पाटील हे राज्य सरकारमध्ये मंत्री होते. पाटील यांना या प्रकरणात काही आर्थिक लाभ झाला का, याचा तपास करण्यासाठी ईडीने पाटील यांची चौकशी केल्याचे समजते.
वाट्टेल ती किंमत देऊ
सत्ताधाऱ्यांची राष्ट्रवादीकडून काही अपेक्षा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. काय असेल ती किंमत देऊ, पण अपेक्षा पूर्ण करणार नाही, हे सूत्र त्यांना पसंत पडत नसल्याने या यातना सहन कराव्या लागत आहेत.
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी
ईडीच्या अधिकाऱ्यांनी मला जे प्रश्न विचारले, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी त्यांना दिली. त्यांचे समाधान करूनच मी त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडलो. आता त्यांचे काही प्रश्न शिल्लक असतील असे वाटत नाही. मी आयुष्यात काहीही चुकीचे केलेले नाही.
- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस