संजय शिरसाटांच्या 'त्या' विधानावर जयंत पाटलांचा टोला, एकाच वाक्यात दिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 06:37 PM2023-06-20T18:37:51+5:302023-06-20T18:40:40+5:30
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पत्रकारांसोबत बोलत असताना, काही पत्रकारांनी त्यांना संजय शिरसाट यांनी त्यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर विचारले होते...
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचा मोठा दावा शिवसेना (एकनाथ शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांनी केला होता. एवढेच नाही, तर शरद पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तेव्हा जयंत पाटील का रडत होते, हे तुम्हाला माहीत आहे का? असा सवाल करत, शिरसाट यांनी त्यांच्यावर निशाणाही साधला होता. यावर पत्रकारांनी विचारले असता जयंत पाटील यांनी एकाच वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले जयंत पाटील? -
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पत्रकारांसोबत बोलत असताना, काही पत्रकारांनी त्यांना संजय शिरसाट यांनी त्यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर विचारले, यावर पाटील म्हणाले, "संजय शिरसाटांपेक्षा माझी क्रेडिबिलीटी जास्त असेल नाही का? त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर तुम्ही माझी रिअॅक्शन विचारणे म्हणजे जरा पुढेच जाते."
नमकं काय म्हणाले होते संजय शिरसाट? -
शिरसाट म्हणाले, "राष्ट्रवादीला आमचा पुळका का आला आहे? हे कळायला मार्ग नाही. जे जयंत पाटील आज स्वतःच भाजपच्या वाटेवर आहेत, ते असे म्हणतात. ज्या पक्षाची स्थापनाच मुळात गद्दारीतून झाली आहे. सोनिया गांधी यांच्या सोबत केलेली गद्दारी, त्यातून निर्माण झालेले हे सर्व आणि ते आम्हाला आता गद्दारीची भाषा शिकवणार, हा संपूर्ण हास्यास्पद प्रकार आहे. त्यामुळे आम्ही त्यांची चिंता करत नाही, असे संजय शिरसाट यांनी म्हटले होते.
शरद पवार यांनी जेव्हा राजीनामा दिला, तेव्हा जयंत पाटील का रडत होते हे तुम्हाला माहीत आहे? त्यांना उद्या काय घडणार हे माहीत आहे. त्यामुळे आता काय करू, शरद पवार साहेब तुम्ही राजीनामा दिला, तर मी तर मेलोच. म्हणून ते ओक्साबोक्सी रडत होते. ते शरद पवार यांच्या राजीनाम्यावर रडत नव्हते. त्यांचं रडणं वेगळं होतं. तुम्हाला सांगतो, असं बोलणारे पटकन उड्या मारतात. त्यामुळे काही दिवस वाट पाहा, तुम्हाला त्यांचे मार्गक्रमण कुठे तरी झालेले दिसेल, असेही शिरसाट यांनी म्हटले होते.