मोदींच्या हस्ते महाराजांचा पुतळा उभारायचा, दर्जाशी घेणे देणे नाही" ; जयंत पाटलांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 06:14 PM2024-08-26T18:14:10+5:302024-08-26T18:17:17+5:30
Jayant Patil : आज दुपारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी समोर आली.
Jayant Patil ( Marathi News ) : मालवण राजकोट किनारी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना आज, सोमवारी दुपारी घडली. या घटनेवरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर आरोप केला."फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उभारायचा होता, यांना पुतळ्याच्या दर्जाशी काही घेणे देणे नव्हते', असंही जयंत पाटील म्हणाले.
राज्यभरात आंदोलन करणार! छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं विरोधक आक्रमक
जयंत पाटील म्हणाले, ही घटना अत्यंत गंभीर आहे. महाराजांचा पुतळा बसवताना काळजी घेतली नाही. सरकारने फक्त पंतप्रधान यांच्या हस्ते हा पुतळा उभारायचा एवढा उद्देश ठेवून इव्हेंट केला. पण, महाराजांच्या प्रती जी काळजी घेणे गरजेची होती. तिथंला वारा, बळकटी ती काळजी घेतली नाही, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.
"मी नेहमी म्हणतो की हे सरकार इव्हेंट सरकार आहे. अनेक रस्त्याच्या कामावर भेगा पडल्या आहेत. यांना कामाच्या दर्जाविषयी देणे घेणे नाही. सरकार कामाच्या दर्जात इंटरेस्ट घेत नाही. नवीन टेंडर काढणे, कमिशन काढणे एवढंच काम सरकार करत आहे, असंही जयंत पाटील म्हणाले. आता खुद्द महाराष्ट्राच्या अराध्यदेवतेच्या बाबतीतही त्यांनी असाच प्रकार केला आहे. फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव वापरायचं पण त्यांच्यासाठी आवश्यक असणारी काळजी घेतली नाही, असंही पाटील म्हणाले.
विरोधक आक्रमक
"या पुतळ्याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले होते. आता सरकार ही जबाबदारी दुसऱ्यावर ढकलतील. या पुतळ्यासाठी सरकारने खर्च केला आहे. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, नाहीतर शिवप्रेमी म्हणून फक्त जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात आम्ही आंदोलन करणार आहोत", अशी भूमिका ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी घेतली.
दरम्यान, भाजपाच्या नेत्यांनी सातत्याने राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला आणि मते घेतली, पण नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. निकृष्ट बांधकामामुळे राजकोट किनाऱ्यावरील पुतळा कोसळला आहे. महाराजांच्या पुतळ्याच्या कामातही भ्रष्टाचार करणाऱ्या या लोकांना महाराष्ट्राची जनता कदापी माफ करणार नाही, असं काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे.