Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 01:28 PM2024-05-02T13:28:21+5:302024-05-02T13:29:16+5:30
Jayant Patil on Lok Sabha Election 2024, Sangli - Chandrahar Patil: महाविकास आघाडीचा सांगलीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ सभेत जयंत पाटील बोलत होते
Jayant Patil on Lok Sabha Election 2024, Sangli - Chandrahar Patil: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सध्या महाराष्ट्रात वातावरण तापले आहे. उन्हाचा तडाखा वाढत असला तरी प्रचारसभांचा उत्साह अजिबातच कमी होताना दिसत नाहीये. राज्यात येत्या ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात बारामती, रायगड, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघांचा समावेश आहे. त्यापैकी सांगलीच्या सभेत आज महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ तासगाव येथे जाहीर सभा झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसंदर्भात 'मविआ'बद्दल दोन मोठे दावे केले.
"महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या बाजूने सध्याचे वातावरण आहे. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांविषयी लोकांच्या मनात प्रचंड नाराजी आहे. महाविकास आघाडीमध्ये एकजूट आहे हे सारेच पाहू शकतात. आघाडी एकसंघपणे लढली तर चित्र पलटू शकते आणि महाविकास आघाडीच्या पैकीच्यापैकी म्हणजेच ४८ जागा निवडून येतील," असा दावा त्यांनी केला. "महाराष्ट्रातून महाविकास आघाडीला मिळणारा प्रतिसाद प्रचंड आहे. हा प्रतिसाद पाहता येत्या विधानसभा निवडणुकीत आपले सरकार येणार," असाही मोठा दावा जयंत पाटील यांनी केला.
"तासगावचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आ. सुमन पाटील या सातत्याने येथील पाण्याचा प्रश्न मांडत आहेत. मी जलसंपदा मंत्री असताना टेंभू योजनेतून या भागात आठ टीएमसी अतिरिक्त पाणी देण्याचा निर्णय घेतला. नदीत पाणीच नाही अशी बतावणी करणारी हुशार लोकं युती सरकारमध्ये होती. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात बराच अभ्यास करून योग्य नियोजन केले. जतच्या उर्वरित भागासाठी सहा टीएमसी पाणी देऊन जत विस्तारित योजनेचे काम सुरू केले. जवळपास १२० गावांना या नियोजनाचा फायदा होणार आहे. सरकार आल्यानंतर टेंभू योजनेतील उर्वरित सर्व कामे एका वर्षाच्या आत पूर्ण करू" ," असे जयंत पाटील म्हणाले.