पंतप्रधान मोदींनी माफी मागितल्यावर जयंत पाटलांची खोचक टीका; म्हणाले, "प्रायश्चित अटळ, या चुकीला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 04:12 PM2024-08-30T16:12:54+5:302024-08-30T16:33:26+5:30

मालवणमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी माफी मागितल्यानंतर जयंत पाटील यांनी टीका केली आहे.

Jayant Patil criticism after PM Modi apologized for the fall of Chhatrapati Shivaji statue | पंतप्रधान मोदींनी माफी मागितल्यावर जयंत पाटलांची खोचक टीका; म्हणाले, "प्रायश्चित अटळ, या चुकीला..."

पंतप्रधान मोदींनी माफी मागितल्यावर जयंत पाटलांची खोचक टीका; म्हणाले, "प्रायश्चित अटळ, या चुकीला..."

Jayant Patil on PM Modi Apology : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. नौदल दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण येथे राजकोट किल्ल्यावर मोठ्या उत्साहात साजरा झाला होता. त्यावेळी राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्धघाटन पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते करण्यात आलं होतं. मात्र आठच महिन्यात हा संपूर्ण पुतळा अचानक कोसळला. आता याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालघर येथील कार्यक्रमात जाहीर माफी मागितली आहे. पंतप्रधान मोदींच्या माफीनाम्यानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. 

नौदल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. मात्र सोमवारी अचानक हा पुतळा कोसळला. त्यानंतर या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. या सगळ्या प्रकरणावर महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पालघर येथील वाढवण बंदराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतळा कोसळल्याबद्दल जाहीर माफी मागितली आहे.

"काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये जे काही घडलं, ते अत्यंत दुख:द आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर ते आमचे आराध्य दैवत आहेत. मी आज नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो. तसेच जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य मानतात, या घटनेमुळे त्यांच्या मनालाही जे वेदना झाल्या आहेत. मी त्यांच्यापुढेही नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.  

विरोधकांनी सावरकरांची माफी मागितली नाही - पंतप्रधान मोदी

"आमचे संस्कार वेगळे आहेत. त्या लोकांसारखे नाहीत, जे महाराष्ट्राचे सुपूत्र असलेल्या वीर सावरकर यांना शिव्या देतात. विरोधकांनी अनेकदा सावरकरांना अपमानित केलं आहे. तसेच देशभक्तीच्या भावनेला पायदळी तुडवलं आहे. मात्र त्यांनी कधीही वीर सावरकर यांची माफी मागितली नाही. त्यामुळे विरोधकांचे संस्कार आता महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती झाले आहेत. पण हे आमचे संस्कार आहे. मी महाराष्ट्राच्या भूमीत येऊन सर्वात आधी छत्रपती शिवरायांची माफी मागितली आहे," असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.  

जयंत पाटील यांची टीका

पंतप्रधान मोदींनी माफी मागितल्यानंतर जयंत पाटील यांनी एक्स पोस्टवरुन त्यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र या चुकीला माफी देऊ शकणार नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. "भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला महाराजांनी कधीच माफी दिली नव्हती. आमचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या वाटेवर चालतो. त्यामुळे साहेब, महाराष्ट्र या चुकीला माफी देऊ शकणार नाही. प्रायश्चित अटळ आहे. जय शिवराय," असे जयंत पाटील यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
 

Web Title: Jayant Patil criticism after PM Modi apologized for the fall of Chhatrapati Shivaji statue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.