महाविकास आघाडीच्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी ईडीचा वापर; जयंत पाटील यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 07:51 PM2021-08-30T19:51:30+5:302021-08-30T19:52:03+5:30
नेते सडेतोड उत्तरं देतील, पण सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न : जयंत पाटील
"महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी ईडीचा वापर होत आहे," असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. यापूर्वी ईडीच्या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीदेखील भाजपवर निशाणा साधला होता.
"निव्वळ महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनाच नव्हे तर देशातील भाजपविरोधी भूमिका घेणाऱ्यांना त्रास देणे व त्यांच्या त्रुटी असतील तर त्या हुडकून काढण्याचा प्रयत्न यंत्रणा करताना दिसत आहेत. ज्यांना नोटीसा आल्या आहेत ते नेते सडेतोड उत्तर देतील. पण सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे," असेही जयंत पाटील म्हणाले.
"अनिल देशमुख यांच्याबाबतीत एक नंबर कोण हे वाझे व इतरांच्या जवाबात सिद्ध झाले आहे. अनिल देशमुख यांचा या केसमध्ये संबंध नाही हे पुन्हा उघड झाले आहे. शिवाय अनिल परब यांच्याविरोधात वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणून स्टेटमेंट घेतले जातेय हे चुकीचे काम सुरू आहे," असेही जयंत पाटील म्हणाले.
नवाब मलिकांकडूनही आरोप
"ईडीमार्फत नेत्यांना नोटीस देणे, काही ठिकाणी छापे टाकले जात आहेत. त्यांना अधिकार असतील तर त्यांनी करावी परंतु ज्यापद्धतीने भाजपचे लोक मागणी करत आहेत व कारवाई होतेय. याचा अर्थ ठरवून राजकीय कारवाई सुरू झाली आहे," असेही नवाब मलिक म्हणाले. "सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत किती केसेस दाखल केल्या व प्रलंबित आहेत याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करायला ईडीला सांगितले होते," असेही त्यांनी नमूद केले.