चिडलेल्या बदलापूरकरांमध्ये मुख्यमंत्र्यांना राजकारण कसं दिसतं?; जयंत पाटलांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 03:21 PM2024-08-21T15:21:18+5:302024-08-21T15:29:41+5:30

बदलापूरच्या अत्याचार घटनेवरुन जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

Jayant Patil criticizes Chief Minister Eknath Shinde over Badlapur atrocities | चिडलेल्या बदलापूरकरांमध्ये मुख्यमंत्र्यांना राजकारण कसं दिसतं?; जयंत पाटलांचा सवाल

चिडलेल्या बदलापूरकरांमध्ये मुख्यमंत्र्यांना राजकारण कसं दिसतं?; जयंत पाटलांचा सवाल

Badlapur School Crime : दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाऱ्याच्या घटनेनंतर मंगळवारी बदलापूरमध्ये नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळाला. दोन चिमकल्यांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या विरोधात हजारो नागरिक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते. काही आंदोलनकांनी आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेच्या आवारात आंदोलन केले. तर संतप्त नागरिकांनी बदलापूर रेल्वेस्थानकात घुसून रेल्वेवाहतूक तब्बल १० तास रोखून धरली होती. यावेळी नागरिकांकडून लाडकी बहीण योजनेचाही निषेध नोंदवण्यात आला. त्यामुळे हे आंदोलन राजकीय प्रेरित होतं असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आरोपावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सवाल केला आहे.

बदलापूरमध्ये आठवड्याभरापूर्वी दोन अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना उघडकीस आल्यानंतर बदलापूरमध्ये जनक्षोभ उसळला होता. या प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत शाळेबाहेर आणि बदलापूर रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं. मात्र या आंदोलनावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे राजकारणातून प्रेरित आंदोलन होतं असं म्हटलं. त्यानंतर झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीतर्फे बदलापूर घटनेच्या निषेधार्थ २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यावेळी जयंत पाटील बोलत होते.

"महाराष्ट्रात महिला, बालकांविरोधात होत असलेल्या अत्याचाराने परिसीमा गाठली आहे. राज्यातील गृह खात्याचे हे सपशेल अपयश आहे. या निष्क्रिय सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने येत्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष, संघटना या बंदमध्ये सहभागी होतील. बदलापूरमध्ये झालेली घटना राजकीय नसून त्याचा कोणीही फायदा घेत नाहीये. महाराष्ट्रामध्ये वाढलेले अत्याचार याची परिसीमा आता गाठलेली आहे. बदलापूरच्या घटनेत गृहखात्याने गुन्हा नोंदवण्यात दिरंगाई केली. शाळा संस्थेने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच बदलापूरकर चिडले आणि रस्त्यावर आले. यात भाजप आणि मुख्यमंत्र्यांना राजकारण कसं दिसतं हे आम्हाला कळत नाही," असा सवाल जयंत पाटील यांनी केला.

 

"महाराष्ट्रातील बालकांविरोधी गुन्हे २०१४ साली आठ हजार होते ते आता २२ हजारांपर्यंत गेले आहेत. महिलांवरील अत्याचार २६ हजारांवरून ५० हजारांपर्यंत पोहोचले आहेत. हे गंभीर आहे. त्याविरोधात २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रची हाक देण्यात आली आहे. यात राजकारण नाही. महाराष्ट्रात कसा अन्याय चालू आहे हे सरकारला दाखवून देण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे," असंही जयंत पाटील म्हणाले.

रक्षाबंधनामुळे मंगळावारी झाले आंदोलन

दरम्यान, अत्याचाराच्या घटनेविरोधातील आंदोलन हे पूर्वनियोजित असल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमवारीच हे आंदोलन करण्याचा काही राजकीय पक्षांचा प्रयत्न होता. मात्र सोमवारी रक्षाबंधन असल्यामुळे आंदोलन मंगळावारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून त्यावरून लोकांना आंदोलनात सामील होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे मंगळवारी सकाळी ६ वाजल्यापासूनच आंदोलक बदलापूर स्थानकाच्या बाहेर जमण्यास सुरुवात झाली होती. सकाळी १० वाजता रेल्वे सेवा पहिल्यांदा रोखली गेली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Jayant Patil criticizes Chief Minister Eknath Shinde over Badlapur atrocities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.