Jayant Patil vs Amit Shah: जयंत पाटील यांचं 'ओपन चॅलेंज'; म्हणाले- "शाहांना आम्ही हे मराठी राज्य मोडू देणार नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 01:46 PM2024-09-26T13:46:09+5:302024-09-26T13:48:01+5:30
Jayant Patil vs Amit Shah, Maharashtra Politics: "अफगानिस्तानहून कांदा आणून शेतकऱ्यांचे पानीपत करण्याचा सरकारचा डाव"
Jayant Patil vs Amit Shah: भाजपाची नुकतीच महाराष्ट्रात एक बैठक झाली. त्यात भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आले होते. या बैठकीत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना रोखा असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला असल्याचे वृत्त अनेक प्रसारमाध्यमांनी दिले. हे लोक म्हणतात महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना रोखा. निवडणुका जम्मू काश्मीरमध्ये, हरियाणामध्ये लागल्या आहेत आणि भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात आढावा घेत आहेत. औरंगजेब २६ वर्षे महाराष्ट्रात राहिला पण मराठी माणसाचे राज्य त्याला मोडता आले नाही. शाहांनाही आम्ही हे मराठी राज्य मोडून देणार नाही, असे खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले.
नाशिक जिल्ह्यातील देवळाली येथे आज शिवस्वराज्य यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. तुतारीचा आवाज सर्वत्र निनादत आहे. लोकं महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, याचे प्रचंड मानसिक समाधान आहे.#शिवस्वराज्य_यात्रा#नाशिक@NCPspeaks@PawarSpeaks@kolhe_amolpic.twitter.com/FFYd0ewrc7
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) September 25, 2024
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये पोहोचली आहे. तेथे जाहीर सभेत जयंत पाटलांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. याशिवाय, अफगानिस्तानहून कांदा आयात करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली. अशा प्रकारे बाहेरून कांदा मागवून शेतकऱ्यांचे पानीपत करण्याचा डाव सरकारने आखला आहे, असा आरोप त्यांनी सरकारवर केला.
जयंत पाटील म्हणाले, अहमदशहा अब्दाली अफगाणिस्तानहून आला आणि पानीपतची लढाई झाली. आता अमित शाह आणि त्यांच्या सरकारने त्याच अफगाणिस्तानतून कांदा आणला आहे. त्यामुळे कांद्याचे दर कोसळत आहे. मराठी सैन्याचे पानीपत झाले तिथून शाह आणि त्यांच्या सरकारने कांदा आणला आणि मराठी शेतकऱ्यांचे पानीपत करण्याचा डाव आखला आहे असा आरोप करत असतानाच देशातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळू नये अशी भूमिका आजच्या राज्यकर्त्यांनी वेळोवेळी घेतली आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.