२०२४ मध्ये भाजपाचा करेक्ट कार्यक्रम होणार, केवळ ४० ते ५० जागा मिळणार, जयंत पाटलांनी थेट आकडाच सांगितला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 02:05 PM2022-04-12T14:05:41+5:302022-04-12T14:06:17+5:30
Jayant News: २०२४ मध्ये भाजपाचा दारुण पराभव होणार, तसेच महाविकास आघाडी एकजुटीने लढल्यास भाजपाला केवळ ४० ते ५० जागा मिळणार असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.
मुंबई - राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. दोन्हीकडच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक जुगलबंदीही रंगत आहे. दरम्यान, २०२४ मध्ये भाजपाचा दारुण पराभव होणार, तसेच महाविकास आघाडी एकजुटीने लढल्यास भाजपाला केवळ ४० ते ५० जागा मिळणार असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी भाजपाबाबत प्रतिक्रिया दिली. तेव्हा ते म्हणाले की, २०२४ पर्यंत देशात वेगवेगळे अनुभव येतील याची मला खात्री आहे. त्यामुळे २०२४ मध्ये देशातील चित्र बदलेल. तसेच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी संघटीतपणे लढली तर भाजपा ४०-५० जागांपेक्षा जास्त जागांवर निवडून येणार नाही, अशी आकडेवारी सांगते, असे जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान, कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा आमने-सामने आले आहेत. त्यामध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या जयश्री जाधव, तर भाजपाकडून सत्यजित कदम हे उमेदवार आहेत. या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत असून, १६ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.