पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का? जयंत पाटलांचा संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 12:02 PM2024-09-02T12:02:24+5:302024-09-02T12:03:20+5:30
"सत्ताधारी आणि यंत्रणेच्या नाकर्तेपणामुळे पुण्याची देशभर बदनामी"
Jayant Patil, Pune Vanraj Andekar Murder: पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात गोळीबार आणि हत्येची खळबळजनक घटना घडली. नाना पेठेसारखा गजबजलेल्या भागात रात्री साडेनऊच्या सुमारास वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली. राज्यातील प्रमुख शहारापैकी एक असलेल्या पुण्यामध्ये ही खळबळजनक घटना घडली. शहरात भरचौकात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का? असा सवाल जयंत पाटील यांनी केला. तसेच, आपल्या ट्विटर हँडलवरून त्यांनी या घटनेबाबत मत व्यक्त केले.
"पुणे शहरात भर चौकात एका व्यक्तीची गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. गेल्या काही वर्षांत पुण्यातील टोळी युध्दाने परिसीमा गाठली आहे. पुण्यातील अंमली पदार्थांचे साठे सापडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. विद्येचे माहेरघर असणारे पुणे सत्ताधारी आणि यंत्रणेच्या नाकर्तेपणामुळे देशभर बदनाम होऊ लागले आहे. या घटनांना आणि पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का?" अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पुण्यात नेमका काय घडला प्रकार?
रविवारी रात्री पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली. नाना पेठे या अतिशय गजबजलेल्या ठिकाणी चौकात वनराज आंदेकर हे चुलत भावासोबत थांबले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. आंदेकर बेसावध होते, गप्पा मारत उभे होते. त्यावेळी काही समजण्याच्या आतच सहा दुचाकींनी त्यांना गराडा घातला. या दुचाकीवरून आलेल्या एकूण १३ जणांनी आंदेकर यांना घेरले. सुरुवातीला त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात वनराज आंदेकर यांचा जागीच मृत्यू झाला. हा सर्व थरार जवळच असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.