Jayant Patil vs Eknath Shinde: शिंदे-फडणवीस सरकारचा महाराष्ट्र हा ४० आमदारांपुरताच मर्यादित; राष्ट्रवादीची खरमरीत टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 21:15 IST2022-08-29T21:14:58+5:302022-08-29T21:15:48+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी सरकारचा घेतला समाचार

Jayant Patil vs Eknath Shinde: शिंदे-फडणवीस सरकारचा महाराष्ट्र हा ४० आमदारांपुरताच मर्यादित; राष्ट्रवादीची खरमरीत टीका
Jayant Patil vs Eknath Shinde: महाविकास आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांना प्राधान्याने मदत केली जात होती. कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला जात होता, मात्र हे सरकार आमदार सांभाळण्यात व्यस्त आहे. या सरकारचा महाराष्ट्र हा ४० आमदारांपुरताच मर्यादित आहे. त्यामुळे या सरकारला वठणीवर आणायला हवे, असा स्पष्ट इशाराच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कार्यकर्ता मेळाव्यात दिला.
"मागच्या आठवड्यातच पावसाळी अधिवेशन मुंबईत पार पडले अतिवृष्टीने बेजार झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी. या भागात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारला धारेवर धरले. सरकारने घाबरून घोषणा तर केली परंतु अजून एक दमडीही या शेतकऱ्यांना दिली गेली नाही", असा थेट आरोप जयंत पाटील यांनी सरकारवर केला. "तरुणाईचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रचंड विश्वास आहे, याची अनुभुती आज तरुणांची गर्दी पाहून आली. हा तरुण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मोठ्या आशेने पहात आहे. आपण त्यांच्या विश्वासाला तडा न जावू देता त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे, सर्व गटतट विसरून आपण सर्वांनी एकत्र यायला हवे. आपण एकत्र आलो तर ही जागा राष्ट्रवादी हमखास जिंकणार", असा विश्वासही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.
"सरकारशी संघर्ष करायचा असेल तर कार्यकर्त्यांची मोठी फौज आपल्याला लागेल. त्यासाठी सभासद नोंदणी तात्काळ पूर्ण करा. सर्वांनी एकत्र येऊन सभासद नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी. आज महाराष्ट्राला सर्वात जास्त विश्वास हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आहे. आपल्याकडे शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याचे विचार आहेत. या विचारांच्या जोरावरच आपण हा पक्ष बांधायचा आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने, तरुणांच्या ताकदीने हा गड आपण पुन्हा राष्ट्रवादीमय करू", असेही जयंत पाटील म्हणाले.