"मुंबईला कमजोर करण्याचा हा घ्या आणखीन एक पुरावा", जयंत पाटलांचा सरकारवर तिखट वार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 04:21 PM2024-01-16T16:21:18+5:302024-01-16T16:24:12+5:30

बॉलिवूडकरांच्या एका निर्णयाचे राजकीय पडसाद उमटण्याची चिन्हे

Jayant Patil slams Eknath Shinde led Govt over Filmfare Awards to feature in Gujarat instead of Gujarat | "मुंबईला कमजोर करण्याचा हा घ्या आणखीन एक पुरावा", जयंत पाटलांचा सरकारवर तिखट वार

"मुंबईला कमजोर करण्याचा हा घ्या आणखीन एक पुरावा", जयंत पाटलांचा सरकारवर तिखट वार

Filmfare Awards 2024, Gujarat Mumbai: हिंदी चित्रपटसृष्टीतील मानाचा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा यंदा गुजरातमध्ये पार पडणार आहे. जियो वर्ल्ड सेंटर येथे फिल्मफेअरच्या वतीने पत्रकार परिषदेत याची घोषणा झाली. चित्रपट निर्माता करण जोहर, अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यावेळी उपस्थित होते. आतापर्यंत दरवर्षी हा पुरस्कार सोहळा मुंबईत होत होता, पण यावेळी गुजरातच्या भूमीत हा सोहळा पार पडणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्याने राजकीय स्तरावर बरीच चर्चा रंगली आहे. तशातच आता बॉलिवूडकरांचा मानाचा पुरस्कार सोहळा मुंबईऐवजी गुजरातमध्ये होणार असल्याने यावर राजकारण रंगताना दिसत आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी याविषयी ट्विट करून नाराजी व्यक्त करत टीका केली आहे.

"मुंबईला कमजोर करण्याचा हा घ्या आणखीन एक पुरावा! दरवर्षी मुंबईत होणारा मानाचा फिल्मफेअर अवॉर्ड आता गुजरातच्या गांधीनगर गिफ्ट सिटी येथे होणार आहे. आधी महाराष्ट्रातून प्रकल्प पळवले गेले, डायमंड व्यवसाय पळवला गेला. आता फिल्मफेअर अवॉर्डही पळवला गेला आहे. बॉलिवूड हे मुंबईचे अविभाज्य घटक आहे. बॉलिवूडला मुंबईची आर्थिक नाडी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे फिल्मफेअर अवॉर्ड गुजरातला हलवून मुंबईच्या आणखी एका आर्थिक स्त्रोत्रावर हात मारण्याचे पहिले पाऊल टाकले गेले आहे. मुख्यमंत्री महोदय यावर काय उत्तर द्याल?" असा थेट सवाल जयंत पाटलांनी केला आहे.

दरम्यान, ६९ फिल्मफेअर पुरस्कार सोहळा यंदा गुजरातच्या गांधीनगरमधील गिफ्ट सिटी येथे २७ आणि २८ जानेवारी अशा दोन दिवस रंगणार आहे. बॉलिवूडच्या तारे-तारकांची या सोहळ्याला हजेरी असणार आहे. 'गुजरात टुरिझम'च्या सहकार्याने हा सोहळा पार पडणार आहे. २०२०चा अपवाद वगळता आातापर्यंत फिल्मफेअर पुरस्कार सोहळा महाराष्ट्रातच झाला आहे. २००१ पासून निर्माता करण जोहर सोहळ्याचं सूत्रसंचालन करत आहे. याही वेळी त्यालाच ही संधी मिळाली आहे.

 

Web Title: Jayant Patil slams Eknath Shinde led Govt over Filmfare Awards to feature in Gujarat instead of Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.