Jayant Patil : "व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा असा या सरकारचा नारा"; जयंत पाटलांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 10:28 AM2024-02-21T10:28:16+5:302024-02-21T10:43:21+5:30
Jayant Patil And Onion : कांदा निर्यातबंदीवरून जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवल्यामुळे आता कांद्याला चांगला भाव मिळेल, अशा अपेक्षेने शेतकऱ्यांनी आनंद साजरा केला. मात्र, कांदा निर्यातबंदी हटवल्याच्या निर्णयाचा आनंद काही काळापुरताच राहिल्याचे निष्पन्न झाले. निर्यात खुली झाल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंगयांनी कांदा निर्यातबंदी ३१ मार्चपर्यंत लागू राहील असे वक्तव्य केल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा मावळल्या आहेत. शिवाय निर्णयाबाबत सरकारामध्येच संभ्रम असल्याचे चित्र आहे.
कांदा निर्यातबंदीवरून जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा असा या सरकारचा नारा" असं म्हणत निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "कांदा निर्यातबंदी उठवली म्हणून काही जण उगाच टाळ्या वाजवत होते. सत्य परिस्थिती ही आहे की, कांदा निर्यातबंदी उठवलीच गेली नाही."
"राज्यात चालू रब्बी हंगामात चार लाख ३२ हजार ७९८ हेक्टरवर कांदा लागवड झाल्याची माहिती आहे. त्यातून हंगाम अखेर सुमारे ८६ लाख टन कांदा उत्पादनाचा अंदाज आहे. सरकार निर्यातबंदी कायम ठेवत असेल तर कांद्याच्या दरात आणखी घसरण होऊ शकते व शेतकऱ्यांचे पुन्हा नुकसान होऊ शकते. व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा असा या सरकारचा नारा!" असं जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
पीटीआयच्या हवाल्याने माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार केंद्रीय ग्राहक मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी याबाबत खुलासा केला आहे. ते म्हणाले की, कांद्याच्या निर्यातीवरील बंदी 31 मार्चपर्यंत कायम राहील, कारण सरकार कांद्याच्या किमती नियंत्रित ठेवण्यास आणि देशांतर्गत उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्नशील असल्याने निर्यात बंदी कायम आहे. त्यामुळे कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्यात आलेली नाही. ती लागू आहे आणि त्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही. तसेच ग्राहकांना वाजवी दरात कांद्याची पुरेशी घरगुती उपलब्धता सुनिश्चित करणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे देखील सिंग यांनी स्पष्ट केले.