Jayant Patil, Farmer's Caste: 'सरकार वर्णभेदासाठी आग्रही...'; शेतकऱ्यांची जात विचारण्याच्या प्रकारावर जयंत पाटीलही संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 02:12 PM2023-03-10T14:12:40+5:302023-03-10T14:13:24+5:30
खत खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना जात विचारली जात असल्याचा प्रकार
Jayant Patil, Farmer Caste Case for fertilizers: सध्या शेतकरी विविध अस्मानी संकटांशी झुंज देत आहेत. सरकार शक्य ती मदत शेतकऱ्यांना देत असले, तरी ती मदत बाधितांपर्यंत पोहोचत नसल्याचा दावा विरोधक करत आहेत. तशातच आता एक नवे प्रकरण पुढे आले असून, त्यात रासायनिक खतांच्या खरेदीसाठी आता शेतकऱ्यांना आपली जात सांगावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीमध्ये खत खरेदीसाठी ई-पॉसमधील (Fertilizer E-Pos) सॉफ्टवेअरमध्ये खरेदीदार शेतकऱ्यांच्या जातीची विचारणा केली जात आहे. त्यामुळे रासायनिक खतांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना जात सांगावी लागत असल्याच्या मुद्द्यावरून जयंत पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
काय म्हणाले जयंत पाटील?
"बळीराजा सध्या विविध कारणांनी त्रस्त आहे. वातावरणातील बदलांमुळे अनेक वेळा शेतमालाचे होणारे नुकसान सध्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम करत आहे. तसेच शेतमालाला न मिळणारा भाव हेदेखील शेतकऱ्यांसाठी चिंतेचे कारण आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना खतासाठी जात विचारणे ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक असून याचा आम्ही निषेध करतो. सरकार वर्णभेदासाठी किती आग्रही आहे हे सरकारच्या या भूमिकेतून दिसत आहे. सरकारने ही भूमिका रद्द केली पाहिजे. ही बाब जातीभेद वाढवणारी ठरू शकते," अशा शब्दांत जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली.
अजित पवारांनीही खडसावले!
"अहो शेतकरी आमची जात आहे... खते खरेदी करताना शेतकऱ्याना जात कसली विचारताय," असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला सभागृहात विचारला. सांगलीचा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला व सरकार जातीवाद निर्माण करू पाहतंय का? असा सवाल केला. "रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात का सांगावी लागत आहे. ती का नोंदवावी लागते आहे. ई पॉस सॉफ्टवेअर मशीनमध्ये जातीचा रखाना टाकण्यात आला आहे. त्यात शेतकऱ्यांना जात सांगावी लागते आहे. त्यामुळे जातीचे लेबल लावण्याचा प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात घडता कामा नये," असे अजित पवारांनी सरकारला खडसावले.