राज्यात कणा नसलेले सरकार; महिलांनंतर आता शासनाचे अधिकारीही असुरक्षित- जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 05:45 PM2024-08-29T17:45:31+5:302024-08-29T17:47:17+5:30
Jayant Patil vs Maharashtra Government: "याआधी उत्तर प्रदेश, बिहार या राज्यात असे प्रकार घडत असल्याचे ऐकले होते"
Jayant Patil vs Maharashtra Government: गेल्या काही दिवसांत राज्यात अनेक विचित्र घटना घडत आहेत. आधी बदलापूरमधील शालेय मुलींवरील अत्याचाराची घटना घडली. त्यानंतर राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या दोन घटनांमुळे विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडत आहेत. तशातच तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांची हत्या केल्याची घटना हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात घडली. या साऱ्या घटनांवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला धारेवर धरले. राज्यातील सरकार हे कणा नसलेले सरकार आहे हे सिद्ध होतंय, अशी बोचरी टीका त्यांनी केली.
आपल्या ट्विटर हँडलवरून जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. "हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात तलाठी कार्यालयात घुसून तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांची हत्या करण्यात आली आहे. या राज्यातील महिला, मुली, सामान्य नागरिक तर सुरक्षित नव्हताच पण आता राज्यातील शासनाचे अधिकारीही सुरक्षित नाहीत असे दिसते. अशा बातम्या वाचून आपल्या राज्यात 'कणा नसलेले सरकार' आहे हेच सिद्ध होत आहे. याआधी आम्ही युपी, बिहारला असे प्रकार घडतात असे ऐकत होतो. मात्र आता महाराष्ट्रातही असे प्रकार घडत आहेत हे पाहून वेदना होतात," असे ते म्हणाले.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात तलाठी कार्यालयात घुसून तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांची हत्या करण्यात आली आहे. या राज्यातील महिला, मुली, सामान्य नागरिक तर सुरक्षित नव्हताच पण आता राज्यातील शासनाचे अधिकारीही सुरक्षित नाहीत असे दिसते. अशा बातम्या वाचून आपल्या राज्यात…
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) August 29, 2024
हिंगोलीच्या वसमतमध्ये नक्की काय घडले?
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील आडगाव येथील तलाठी संतोष पवार यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. संतोष पवार हे तलाठी सज्जात कामकाज सुरू असताना आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला. आरोपीने आधी संतोष पवार यांच्या तोंडावर मिरची पूड फेकली. त्यानंतर आरोपीने संतोष पवार यांच्यावर चाकूने हल्ला केला. हा प्रकार बुधवारी (२८ ऑगस्ट) घडला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
तलाठी पदावर कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्याची अशाप्रकारे निर्घृण हत्या कशी होऊ शकते? आरोपीला पोलिसांचं भय नव्हते का? असे प्रश्न या प्रकारानंतर उपस्थित होत आहेत. या प्रकरणी विविध कलम अंतर्गत आरोपी विरोधात हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली. या हत्येनंतर राज्यभर संताप पाहायला मिळात आहे.