Jayant Patil vs Eknath Shinde Devendra Fadnavis: "शेतकऱ्यांची दिवाळी दु:खात, सरकार दिलासा देण्यात अपयशी"; राष्ट्रवादीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 08:53 PM2022-11-03T20:53:36+5:302022-11-03T20:54:19+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा हल्लाबोल
Jayant Patil vs Eknath Shinde Devendra Fadnavis: "अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, त्यांची दिवाळी दुःखात गेली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे होते, त्यांना दिलासा द्यायला हवा होता. मात्र तसे होताना दिसले नाही. सरकारमध्ये गतिमानता दिसत नाही हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले," असा रोखठोक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. ते शिर्डीमध्ये बोलत होते.
"भाजपने टोळीबरोबर आघाडी केली आहे, पक्षाबरोबर नाही. ज्यादिवशी शिंदे गटाचा उपयोग संपेल त्यादिवशी त्यांना सोडण्यात येईल. सत्तांतराचा विषय न्यायालयात प्रलंबित आहे त्यामुळे यासरकारचे कधीही काहीही होऊ शकते. निवडणुका कधीही लागू शकतात आम्ही तयारीत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसला ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे. राष्ट्रवादी तळागाळात असल्याने हे शक्य झाले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आम्ही चांगली कामगिरी करू," असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
"स्वतःच्या विजयाबद्दल सरकारला आत्मविश्वास नाही, खोक्यांचा वाद अजून मिटत नाही, मंत्रिमंडळाच्या विस्तारापर्यंत थांबू असा १०-१२ आमदारांचा निरोप आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर निर्णय घेऊ असे आमदार खाजगीत बोलतात. महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेतलेल्य विविध परीक्षात उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले आहे. मात्र महाराष्ट्रात कधी नियुक्ती पत्र वाटण्याचे कार्यक्रम घेतले गेले नाही इतकी नामुष्की सरकारवर ओढवली आहे," असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.
भिडे गुरूजींच्या विधानाबद्दल...
"भिडेंचा निषेध करावा तितका कमी आहे. एखाद्या महिलेला असे बोलणे योग्य नाही. कोणत्याच व्यक्तीला हे न पटणारे आहे. कुंकू लावावे की नाही ते त्या महिलांचे वैयक्तिक प्रश्न आहे," असे जयंत पाटील म्हणाले.
गुजरात निवडणुकांच्या घोषणेबाबत...
आज पंतप्रधान मोदी यांनी गुंतवणूकीची घोषणा केली. गुजरात राज्याच्या आज निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आता तिथे आचारसंहिता लागू झाली आहे. आधीच या सरकारने मोठे प्रकल्प तिकडे नेले आहेत. आता तिकडे काही नेऊ शकत नाही म्हणून आज घोषणा केली गेली आहे असेही जयंत पाटील म्हणाले.