"राजकारणातल्या लोकांना अशा पद्धतीनं भीती दाखवायला लागले तर देशातील लोकशाहीच संपुष्टात येईल"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 03:43 PM2021-06-27T15:43:10+5:302021-06-27T15:43:22+5:30
उद्या मोदी किंवा फडणवीस यांच्यावरही एखादा अधिकारी आरोप करु शकतो, त्यामुळे हे राजकीयदृष्ट्या चुकीचं, पाटील यांचं वक्तव्य.
"राजकारणात उद्या नरेंद्र मोदीसाहेब किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावरही एखादा अधिकारी आरोप करु शकतो, त्यामुळे हे राजकीयदृष्टया अत्यंत चुकीचे आहे. राजकारणातल्या लोकांना अशा पध्दतीने भीती दाखवायला लागले तर देशातील लोकशाहीच संपुष्टात येईल," अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
पत्रकार परिषदेत अनिल देशमुख यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचा प्रश्न पाटील यांना विचारला असता जयंत पाटील यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. "NIA ने मनसुख हिरेन यांच्या हत्येच्यादृष्टीने मेन टार्गेट ठेवले पाहिजे. परंतु त्याऐवजी अटक झालेल्या व्यक्तीकडून काही वदवून घेऊन त्यादृष्टीने सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या लोकांना त्रास देण्याचा हा नवा प्रकार देशात भाजपने सुरू केलेला दिसतो," असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला.
"परमबीर सिंग यांना आयुक्त पदावरून हटवल्यानंतर त्यांनी आरोप केला आहे म्हणजे याअगोदर त्यात तुम्ही सहभागी होतात का? असा प्रश्न निर्माण होत आहे," असेही जयंत पाटील म्हणाले. कुणीतरी 'अ' आणि 'ब' चं नाव घेत असेल आणि त्यावर कारवाई होत असेल, तर ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. असंच घाबरवण्याचं काम केंद्र सरकारच्या एजन्सी करत असतील तर लोकशाहीला सुरुंग लावण्याचं काम सुरू झालं आहे," असं गंभीर विधानही जयंत पाटील यांनी यावेळी केले.