संभाजी भिडेंना कोरेगाव-भीमा प्रकरणात जयंत पाटलांमुळे क्लीनचिट : प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 02:11 PM2022-05-05T14:11:52+5:302022-05-05T14:13:58+5:30

Prakash Ambedkar : नाशिकमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस अधिकाऱ्यांना एका ठराविक विचारसरणीचे लोकच दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असतात अशी शिकवण दिली जाते. दुसऱ्या बाजूच्या लोकांबद्दल ते बोलत नाहीत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

Jayant Patil's clean chit to Sambhaji Bhide in Koregaon-Bhima case: Prakash Ambedkar | संभाजी भिडेंना कोरेगाव-भीमा प्रकरणात जयंत पाटलांमुळे क्लीनचिट : प्रकाश आंबेडकर

संभाजी भिडेंना कोरेगाव-भीमा प्रकरणात जयंत पाटलांमुळे क्लीनचिट : प्रकाश आंबेडकर

googlenewsNext

पुणे : कोरेगाव - भीमा हिंसाचार प्रकरणात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यामुळेच क्लीनचिट मिळाली, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला. ज्या तपास अधिकाऱ्याने हे क्लीनचिट दिले आहे, त्याने सुप्रीम कोर्टात दिलेले प्रतिज्ञापत्र वाचलेले नाही. त्यात सुप्रीम कोर्टाला असे कळवले आहे की, संभाजी भिडे आणि एकबोटे दोषी आहेत. त्यामुळे तपास अधिकाऱ्याने कुणाच्या तरी सांगण्यावरुन क्लीनचिट दिली आहे. तपास अधिकाऱ्याने सुप्रीम कोर्टात जे प्रतिज्ञापत्रात दिले आहे. त्यामध्ये भिडेंना दोषी ठरवले आहे. आता भूमिका बदलल्यास तो तपास अधिकारीच विटनेस बॉक्समधे येईल. त्या अधिकाऱ्याला ग्रामीण पोलिसांनी सुप्रीम कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राचा सामना करावा लागेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते. 

तपास अधिकारी संभाजी भिडे यांना क्लीनचिट देण्याच्या निष्कर्षापर्यंत कसा पोहोचला? न्यायालयात संभाजी भिडे यांचे नाव आरोपपत्रातून वगळण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला विरोध होईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे संभाजी भिडे यांच्या पाया पडतानाचे छायाचित्र आहे. त्यामुळे लक्षात घेतले जावे की सूत्रं कुठून हलत असतील. तर हा सगळा घोटाळा आहे आणि त्याची कागदपत्रे माझ्याकडे आहेत, असे शरद पवारांनी म्हटले होते. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुफळी बाहेर येत आहे, असेही आंबेडकर यांनी म्हटले.

याचबरोबर, भाजपचाही यात पूर्ण रोल आहे. इथल्या कुठल्याही यशस्वीपणे सत्ता राबवायची असेल तर ज्या टेरेरिस्ट ऑर्गनायझेशन आहेत त्यांचा परिचय पोलिसांना करुन दिला पाहिजे. नाशिकमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस अधिकाऱ्यांना एका ठराविक विचारसरणीचे लोकच दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असतात अशी शिकवण दिली जाते. दुसऱ्या बाजूच्या लोकांबद्दल ते बोलत नाहीत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

"प्रस्थापित पक्ष ओबीसींना आरक्षण मिळू देणार नाहीत"
महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्ष ओबीसींना आरक्षण मिळू देणार नाहीत. जाणीवपूर्वक इम्पीरिकल डेटा गोळा केला जात नाही. ओबीसी आणि बहुजन समाजाने राज ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद न देऊन ते शहाणे होत असल्याच दाखवून दिले आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आरक्षण विरोधी आहेत, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Web Title: Jayant Patil's clean chit to Sambhaji Bhide in Koregaon-Bhima case: Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.