जयंत सावरकरांना ‘भावे गौरव पदक’
By Admin | Published: October 13, 2016 05:46 AM2016-10-13T05:46:21+5:302016-10-13T05:46:21+5:30
अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्यावतीने दिले जाणारे ‘विष्णुदास भावे नाट्य गौरव पदक’ यंदा ज्येष्ठ अभिनेते, नाटककार जयंत सावरकर
सांगली : येथील अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्यावतीने दिले जाणारे ‘विष्णुदास भावे नाट्य गौरव पदक’ यंदा ज्येष्ठ अभिनेते, नाटककार जयंत सावरकर यांना जाहीर करण्यात आले आहे. येत्या ५ नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते हे पदक त्यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. कराळे म्हणाले की, प्रतिवर्षी रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या श्रेष्ठ कलाकारास ‘विष्णुदास भावे गौरव पदका’ने सन्मानित करण्यात येते. यंदाचे ५१ वे पदक जयंत सावरकर यांना जाहीर करण्यात आले आहे. रंगभूमी क्षेत्रातील हे मानाचे पदक असून, आजवर बालगंधर्व, केशवराव दाते, आचार्य अत्रे यांच्यापासून ते विक्रम गोखले यांच्यापर्यंत अनेक दिग्गज रंगकर्मी, नाटककार, लेखकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गौरवपदक, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि ११ हजार रुपये, असे त्याचे स्वरूप आहे. (प्रतिनिधी)