जयंतराव, कहानी बहोत पुरानी है!
By admin | Published: July 23, 2016 04:24 AM2016-07-23T04:24:10+5:302016-07-23T04:24:10+5:30
विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी जोरदार टोलेबाजी करताना गेल्या १५ वर्षांतील भ्रष्ट कारभाराने राज्याचे अप्रतिष्ठा झाल्याची टीका केली
मुंबई : कलंकित मंत्र्यांबाबत विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी जोरदार टोलेबाजी करताना गेल्या १५ वर्षांतील भ्रष्ट कारभाराने राज्याचे अप्रतिष्ठा झाल्याची टीका केली. माजी वित्त मंत्री जयंत पाटील यांना उद्देशून ते म्हणाले, ‘जयंतराव! कहानी बहोत पुरानी है और इसमे बहोत टिष्ट्वस्ट है!’ काही घोटाळ्यांमध्ये अजित पवार यांचे नाव घेता घेता त्यांनी, जाऊ द्या! आज वाढदिवस आहे, असे म्हटले तेव्हा सभागृहात हशा पिकला. आज मुख्यमंत्री आणि अजित पवार या दोघांचाही वाढदिवस होता.
मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी बँकेला ४९ कोटी रुपयांनी फसविल्याचा आरोप हास्यास्पद आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. जयकुमार रावल यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, याचिकाकर्त्यानेच त्याची कोणतीही हरकत नसल्याचे उच्च न्यायालयास गेल्या आठवड्यातच सांगितले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मालकीची जमीन त्यांनी प्रतिज्ञापत्रात दाखविली नाही. या जमिनीच्या मालकीविषयी त्यांना माहितीही नव्हती. तरीही माहिती समोर येताच त्यांनी ती जमीन मूळ मालकाला परत केली. आघाडी सरकारच्या काळात बळकवलेल्या किती जमिनी तुम्ही परत केल्या, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केला.
महिला व बालकल्याण विभागाच्या पूरक पोषण आहार खरेदीत एक पैशाचाही गैरव्यवहार झालेला नाही. एकही निविदा उच्च न्यायालयाने रद्द केलेली नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
तुमच्याबद्दल काय बोलू?
आघाडी सरकारमधील घोटाळ्यांबद्दल काय काय बोलायचे, असा तिरकस सवाल करून मुख्यमंत्री म्हणाले, लेंटिन आयोग, पी.बी.सावंत आयोग, न्या.बट्टा आयोगाचे काय झाले? दूध संघ, सुतगिरण्या, पतसंस्था आदींची राखरांगोळी कोणी केली हे सांगायला लावू नका. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी असलेल्या गायी काँग्रेसच्या
नेत्यांनी लाटल्या, असा आरोपही त्यांनी केला. (प्रतिनिधी)