जयदेव तडजोडीस तयार, पण उद्धवना हवी मुदत
By admin | Published: December 18, 2014 05:35 AM2014-12-18T05:35:47+5:302014-12-18T05:35:47+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्रावरून त्यांच्या मुलांमध्ये वाद सुरू असून त्यात सामोपचाराने तोडगा काढण्यास जयदेव यांनी तयारी दर्शवली आहे.
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्रावरून त्यांच्या मुलांमध्ये वाद सुरू असून त्यात सामोपचाराने तोडगा काढण्यास जयदेव यांनी तयारी दर्शवली आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी यास तूर्तास नकार दिला आहे़ याबाबत विचार करण्यासाठी त्यांना अजून काही दिवसांची मुदत हवी आहे़ उभयतांच्या या निर्णयाची माहिती बुधवारी उच्च न्यायालयाला देण्यात आली़ ती ग्राह्य धरत न्यायालयाने ही सुनावणी ६ जानेवारीपर्यंत तहकूब केली़
न्या़ गौतम पटेल यांच्यासमोर ही सुनावणी झाली़ न्यायालयाने ठाकरे बंधूंना या वादावर सामोपचाराने तोडगा काढण्याचा सल्ला देताना सांगितले की, न्यायालयीन लढाई लढण्यापेक्षा दोघाही भावांनी यावर एकत्रित बसून मध्यम मार्ग काढायला हवा़ दोघांची इच्छा असल्यास न्यायालय यात हस्तक्षेप करेल व या चर्चेचे संपूर्ण चित्रिकरण केले जाईल़ चर्चेत तोडगा निघाल्यास तो गुप्त ठेवला जाईल़
तसेच न्यायालयाने हस्तक्षेप करू नये असे वाटत असल्यास एका स्वतंत्र मध्यस्थाची यासाठी नियुक्ती केली जाईल व त्याच्या मदतीने दोघा भावांनी तोडगा काढवा़ अन्यथा न्यायालयात याचा तोडगा निघाला तरी उभयतांना त्याला वरच्या कोर्टात आव्हान देण्याची मुभा राहील व हे प्रकरण न्यायालयातच वर्षानुवर्षे राहील. जयदेव हे राजकीय नेते नाहीत, तेव्हा त्यांनी घेतलेल्या पुढाकारावर उद्धव यांनी विचार करावा, असे मत न्या़ पटेल यांनी व्यक्त केले़