नवाब मलिकांविरोधात जयकुमार रावल यांचा अब्रू नुकसानीचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 07:34 PM2018-01-30T19:34:47+5:302018-01-30T19:36:20+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांनी अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
धुळे: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांनी अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. नवाब मलिक यांनी रावल यांच्यावर कवडीमोल भावाने जमिनी हडपल्याचा आरोप केला होता. आज दोडाईचा पोलिसात जयकुमार रावल यांनी नबाब मालिक यांच्याविरोधात अब्रू नुकसानीची तक्रार दाखल केली आहे. अब्रू नुकसानीची तक्रार दाखल केल्याने मलिक यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे. पो. नि. हेमंत पाटील यांनी भादंवि कलम 499 व 500 नुसार मानहानीचा तक्रार दाखल केली असून पुढील तपास पो उपनीरीक्षक निलेश मोरे करीत आहेत.
धुळे जिल्हयातील विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांच्यावर आरोप करणं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या अंगाशी येण्याची चिन्हं आहेत. कारण विखरण येथे जयकुमार रावल यांनी घेतलेली जमीन ही अधिसूचना निघाल्याच्या 2 महिने आधीच खरेदीचा व्यवहार झाला असून त्यासाठी महाजन को सह जिल्हाधिकारी ,धुळे यांनी त्यांना रितसर परवानगी दिली असल्याचे रावल आज पत्रकार परिषदेत म्हणाले. त्याच दस्ताऐवजांच्या आधारे रावल यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात दोंडाईचा पोलिसात तक्रार देवून दोडाईचा न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे.
धुळे जिल्यातील विखरण येथील वीज प्रकल्पासाठी 2009ला शेतकरीची जमीन भूसंपादन अधिकाऱ्यानी अधिग्रहित केली आहे.त्यात अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनीचा कमी मोबदला मिळाल्याचा कारणावरून धर्मा पाटील यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला .त्यात दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर नवाब मलिक यांनी करून रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याविरोधात जमीन बळकविल्याचा व धर्मा पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप केला होता. त्यामुळे जयकुमार रावल यांच्या राजकीय व सामाजिक प्रतिष्टेला धक्का पोहचला .राजकीय बदनामी केली, अशी तक्रार रावल यांनी केली.
दरम्यान, तक्रार दिल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना रावल यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनाच आरोपींच्या पिंज-यात उभे केले. समाजसेवक अण्णा हजारे यांनी मलिक यांचे भ्रष्ट्राचाराचे प्रकरण बाहेर काढले होते, त्यावेळी मलिक यांना राजीनामा दयावा लागला असल्याचे नमुद करत रावल परीवार हा दानशूर परीवार असून लोकांच्या जमिनी घेण्याचे सांगणा-या नवाब मलिकांना रावल परीवाराचा इतिहास माहित नाही, रावल परीवाराकडे स्वातंत्रपूर्व काळात 5000 एकर जमिन होती, त्यातून बाजार समिती, दुध संघ, खरेदी विक्री संघ, टेलिफोन कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय, बस स्टॅन्ड अशा विविध सार्वजनिक ठिकाणी जमिनी नाममात्र दरात दिलेल्या आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांची रावल परीवारावर टीका करण्याची लायकी नाही, दोंडाईचा येथील कत्तलखान्याला आम्ही विरोध केल्यामुळे नवाब मलिक यांचा जळफळाट झाल्याचे जयकुमार रावल यांनी यावेळी नमुद केले.