जयमहेश कारखान्याने दाखविला दोनशे कामगारांना घरचा रस्ता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2016 08:33 PM2016-07-18T20:33:44+5:302016-07-18T20:33:44+5:30
माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील खाजगी तत्वावरील एनएसएल ग्रुपच्या जय महेश साखर कारखान्याने 'लिव्ह आॅफ'च्या नावाखाली चक्क दोनशे कामगारांना पूर्व कल्पना न देता
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. १८ - माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील खाजगी तत्वावरील एनएसएल ग्रुपच्या जय महेश साखर कारखान्याने 'लिव्ह आॅफ'च्या नावाखाली चक्क दोनशे कामगारांना पूर्व कल्पना न देता कामावरुन काढून टाकले आहे. या विरोधात कामगार युनियनच्या वतीने सोमवारी कारखान्यासमोर कामगारांनी ठिय्या आंदोलन केले.
मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यासह माजलगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. परिणामी शेतकऱ्यांचे ऊस उत्पादन घटले आहे. अशा स्थितीत कामगारांवरही बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. जय महेश साखर कारखान्यात काम करणाऱ्या दोनशे मजुरांना कसलीही पूर्व कल्पना न देता कामावरुन काढून टाकले आहे. या प्रकारामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. काढून टाकण्यापूर्वी कामगारांना विश्वासात घेणे आवश्यक होते, मात्र असा कुठलाही प्रयत्न साखर कारखाना प्रशासनाकडून झाला नाही. परिणामी दोनशे गोरगरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. या विरोधात संतप्त कामगारांनी कारखानास्थळावर ठिय्या मांडला आहे. मात्र कामगारांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी एकही अधिकारी पुढे आला नाही. आम्हाला तात्काळ काम द्या, त्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असे आंदोलनकर्त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. अधिकाऱ्यांचे वेतन देण्यासाठी कारखान्याकडे पैसे आहेत, मात्र कामगारांना वाऱ्यावर सोडले आहे. कारखान्याने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. या निर्णयामुळे आम्हा कामगारांवर अन्याय झाला असल्याचे दिलेल्या पत्रकात कामगारांनी म्हटले आहे.
खाजगी तत्वावर चालणाऱ्या जय महेश साखर कारखान्याने घेतलेल्या निर्णयामुळे सोमवारी कामगार आक्रमक झाले होते. या निर्णयामुळे दोनशे कामगारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.
हा तर व्यवस्थापनाचा निर्णय
सोमवारी जेंव्हा कामगारांनी ठिय्या आंदोलन केले तेंव्हा कामगारांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी प्रशासनातील एकही अधिकारी पुढे आला नाही. जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत माघार नाही, असा निर्धार कामगार आंदोलकांनी केला आहे
कामगार व कारखाना व्यवस्थापन यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयाला आम्ही काहीच करू शकत नाहीत. कामगारांबाबतचे काही वाद न्यायालयात देखील सुरू आहेत. व्यवस्थापनाचे निर्णय आहे.
- अशोक पवार, जय महेश साखर कारखाना व्यवस्थापक