जयश्रीमुळे पोलिसांची मान उंचावली

By admin | Published: July 10, 2015 12:05 AM2015-07-10T00:05:48+5:302015-07-10T00:05:48+5:30

मनोजकुमार शर्मा : जयश्री बोरगी हिचा जिल्हा पोलीस दलातर्फे सत्कार

Jayshree raised the values ​​of the police | जयश्रीमुळे पोलिसांची मान उंचावली

जयश्रीमुळे पोलिसांची मान उंचावली

Next

कोल्हापूर : जयश्री हिने अमेरिकेतील व्हर्जिनिया येथे भरविण्यात आलेल्या वर्ल्ड पोलीस आणि फायर गेम्समध्ये तीन सुवर्णपदके पटकावून कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचा झेंडा साता समुद्रापार नेला. तिच्या या कामगिरीने दलाची मान उंचावली, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी केले.
जिल्हा पोलीस दलातर्फे गुरुवारी आयोजित सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहकाऱ्यांनी बोरगी हिच्यावर पुष्पवृष्टी करत स्वागत केले.
शर्मा म्हणाले, जयश्रीने १०००० मी, ५००० मी. आणि ३००० मीटरमध्ये सुवर्णपदक पटकावत जिल्हा पोलीस दलाची मान उंचावण्यास हातभार लावला आहे. ही अद्वितीय कामगिरी करून कोल्हापूर पोलीस दलात एक नवा अध्याय सुरू केला आहे. या कामगिरीमुळे कोल्हापूर पोलीस दलाचे नाव साता समुद्रापार नेत नव्या खेळाडूंना प्रेरणा घेण्यास मदत होईल. तिची ही कामगिरी दलातील अन्य खेळाडूंना नक्कीच प्रेरणादायी असून तिने एवढ्याच यशावर हुरळून न जाता आणखी चांगली कामगिरी करून आॅलिम्पिकपर्यंत मजल मारावी. तिला जी काही मदत लागेल, त्याकरिता आम्ही ती पुरविण्यास तयार आहोत.
पोलीस दलाचे क्रीडाप्रमुख संदीप जाधव म्हणाले, कोल्हापूर पोलीस दलातील खेळाडूंना अधिक साहित्य मिळाल्यास नक्कीच ते आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करतील. जो विश्वास आपण या खेळाडूंवर दाखविला आहे. तो विश्वास हे सर्व खेळाडू सार्थ ठरवतील.
यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे, उपअधीक्षक (गृह) अनिल पाटील, आई महादेवी, भाऊ आनंद, सोमनाथ बोरगी यांच्यासह पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.


स्पॉन्सरशीपसह हवी ती मदत करा
पोलीस महानिरीक्षक संजयकुमार यांनीही जयश्रीचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी ते म्हणाले, जयश्रीला दलाकडून सर्व ती मदत करा. तिला पोलीस महासंचालकांचे पदक मिळण्याकरिता अहवाल द्या. त्याचबरोबर तिला आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी बाहेरील स्पॉन्सरही मिळवून द्या. जमेल तितकी मदत करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले.
आज महासंचालकांतर्फे होणार सत्कार
जयश्रीच्या या कामगिरीची दखल राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी घेतली असून, तिला आज, शुक्रवारी मुंबई येथील महासंचालकांच्या कार्यालयात उपस्थित राहण्याची सूचना दिली आहे. त्याठिकाणी तिचा गौरव करण्यात येणार आहे.

माझी माझ्याशीच स्पर्धा : बोरगी
कोल्हापूर : व्हर्जिनिया (अमेरिका) येथे झालेल्या वर्ल्ड पोलीस अ‍ॅँड फायर स्पर्धेत परदेशी खेळाडू कसे धावतात, हे पाहून मी स्पर्धेत धावले. मात्र, मला आता माझ्याशीच स्पर्धा करून जिंकायचं आहे. येणाऱ्या आशियाई क्रॉस कंट्री स्पर्धेत आठ किलोमीटरच्या शर्यतीमध्ये सुवर्णपदक मिळवायचं आहे, असे मत जिल्हा पोलीस दलाची आंतरराष्ट्रीय धावपटू जयश्री बोरगी हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
जयश्री पुढे म्हणाली, सध्या मला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जादा साहित्यासह सराव करावा लागणार आहे. याकरिता स्टिपल चेस हर्डल्स, पाण्यातून उडी टाकण्यासाठी वॉटर टँक, आदी साहित्याची गरज आहे. याशिवाय त्या दर्जाचे मैदान हवे आणि या सर्वांत प्रशिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. व्हर्जिनियातील स्पर्धेकरिता मला केवळ एक महिना सरावाची संधी मिळाली. त्यात मी तीन सुवर्णपदके मिळविली. मी या कामगिरीवर खूश असून, यापुढेही याहीपेक्षा चांगली कामगिरी करून दाखवीन. स्पर्धेसाठी शरीराची ठेवण व आहारात बदल केल्याने मी ही कामगिरी करू शकले. मला पुण्यामध्ये सुभाष व्हनमाने, भीमा मोरे यांची मदत झाली.
कोल्हापुरातही माझ्यासारखे अन्य खेळाडू आहेत. त्यांना प्रायोजक मिळाला तर ते माझ्याहीपेक्षा सरस कामगिरी करतील. कोल्हापुरात या स्पर्धांच्या तयारीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध केल्यास हे खेळाडू चांगली कामगिरी करतील.
माझ्यापुढे भारताची आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर हिचा आदर्श आहे. मला आशियार्ई क्रॉस कं ट्री स्पर्धेची तयारी करायची असून, त्यात सुवर्णपदक पटकवायचे आहे. या स्पर्धेवर मी लक्ष केंद्रित केले आहे. पोलीस दलाकडूनही सहकार्य मिळत आहे. या यशात पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, क्रीडाप्रमुख संदीप जाधव, सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले आहे.

Web Title: Jayshree raised the values ​​of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.