जयसिंगरावांनी राजर्षी शाहूंना जगभर पोहोचविले
By admin | Published: January 28, 2017 11:37 PM2017-01-28T23:37:43+5:302017-01-28T23:37:43+5:30
ज्याच्या हातात लेखणी असते तो इतिहास आपल्या विचारधारेने लिहितो, अशा विचारांतून छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांचे चरित्रदेखील चुकीच्या पद्धतीने मांडले
कोल्हापूर : ज्याच्या हातात लेखणी असते तो इतिहास आपल्या विचारधारेने लिहितो, अशा विचारांतून छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांचे चरित्रदेखील चुकीच्या पद्धतीने मांडले गेले होते. मात्र, डॉ. जयसिंगराव पवार यांनी आपल्या संशोधनातून त्यांच्या कार्याचे वास्तव आणि सत्य पुराव्यांनिशी जगासमोर आणले. त्यांच्यामुळे राजर्षी शाहू महाराजांचे जीवनकार्य जगभरात पोहोचले, असे गौरवोदगार ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी शनिवारी येथे काढले.
केशवराव भोसले नाट्यगृहात ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य होते. व्यासपीठावर श्रीमंत शाहू महाराज, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, विशाखा खैरे, प्राचार्य टी. एस. पाटील उपस्थित होते. यावेळी पवार यांच्या हस्ते डॉ. जयसिंगराव पवार यांचा कोल्हापुरी फेटा, घोंगडी, पुष्पहार, गौरवपत्र आणि गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या पत्नी वसुधा पवार यांना महापौर हसिना फरास यांच्या हस्ते शाल, साडी, ओटी, आहेर, पुष्पहार देऊन गौरवण्यात आले.
शरद पवार म्हणाले, ‘इतिहास लिहिण्याची जबाबदारी असलेल्यांनी आपल्या ग्रंथांतून छत्रपती शिवाजी महाराजांना मुस्लिमद्वेषी दाखविले, संभाजी महाराज स्त्री लंपट आणि व्यसनी असल्याचे मांडले, दादोजी कोंडदेवांना शिवाजी महाराजांचे गुरूपद देण्याचा प्रयत्न केला. इतिहासातील अनेक व्यक्ती कर्तृत्ववान असतानाही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. करवीर संस्थान पेशव्यांच्या कचाट्यातून वाचविलेल्या महाराणी जिजाबार्इंची दखल घेतली नाही. ताराबार्इंचे शौर्य मांडले नाही. मात्र, डॉ. पवारांनी अनेक वर्षांच्या संशोधनातून खरा इतिहास समाजासमोर आणला. समाजाला दिशा देण्याचे काम केलेल्या आणि आजच्या प्रशासकांसमोर आदर्श निर्माण राज्यकर्त्यांच्या वास्तवतेचे चित्र मांडण्याचे काम केले. त्यांच्या ग्रंथांमुळे राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा फुले उत्तर भारतात सर्वत्र पोहोचले.’
भाई वैद्य यांनी इतिहासात ढवळाढवळ केली जात असल्याचे सांगून पवार यांचे ग्रंथ लिहिल्याबद्दल आभार मानून आता त्यांनी शिवचरित्र लिहावे, अशी अपेक्षा बोलून दाखविली. (प्रतिनिधी)
शिवचरित्राचे शिवधनुष्य उचलणार..
डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, ‘माझ्याकडून शिवाजी महाराजांचे चरित्र लिहायचे राहून गेल्याची खंत मी व्यक्त केल्यानंतर गोविंद पानसरे मला म्हणाले, तुम्ही शिवचरित्र लिहाच. मृत्यूनंतर पानसरे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेताना मी शिवचरित्र लिहिण्याचे शपथ घेतली. माझे शिवचरित्र बोटा-पोटाचे नसेल तर ते विश्लेषणात्मक असेल. पाच वर्षांनी माझं एक कपाट असं असेल ज्यात शाहूंचे चरित्रग्रंथ १५ भारतीय भाषांमध्ये आणि १० विदेशी भाषांमध्ये प्रकाशित झालेले असतील आणि शिवचरित्र लिहिल्याशिवाय मी निरोप घेणार नाही. महिन्याभरात छत्रपती राजाराम महाराजांवर लिहलेले चरित्रग्रंथ प्रकाशित करणार आहे.