जीन्स हे ‘बॉम्बे कल्चर’ आहे का?
By admin | Published: March 30, 2017 04:25 AM2017-03-30T04:25:10+5:302017-03-30T04:25:10+5:30
जीन्स, टी-शर्ट घालून न्यायालयात वावरणे, हे ‘बॉम्बे कल्चर’ (बॉम्बे हायकोर्टाचे) आहे का? अशी विचारणा
मुंबई : जीन्स, टी-शर्ट घालून न्यायालयात वावरणे, हे ‘बॉम्बे कल्चर’ (बॉम्बे हायकोर्टाचे) आहे का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी कोर्टरूममध्ये उपस्थित असलेल्या पत्रकारांना केली. उच्च न्यायालयाच्या या प्रश्नामुळे नाराज झालेल्या पत्रकारांनी लगेचच कोर्टरूम सोडले.
डॉक्टर संपप्रकरणी सुनावणी सुरू असताना, मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर यांनी अचानकपणे केलेल्या या प्रश्नाने कोर्टरूममध्ये उपस्थित असलेले पत्रकार अवाक् झाले. डॉक्टर संपाविरुद्ध दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील गेल्या सुनावणीत आपण केलेल्या भाष्याचा विपर्यास करण्यात आला, अशी तक्रार मुख्य न्या. चेल्लुर यांनी थेट पत्रकारांकडे केली. या तक्रारीनंतर सुनावणी सुरू झाली. मात्र, अचानकपणे मुख्य न्यायाधीशांनी जीन्स, टी-शर्ट घातलेल्या पत्रकाराला अशा प्रकारे जीन्स, टी-शर्ट घालून न्यायालयात वावरणे हे ‘बॉम्बे कल्चर’ (बॉम्बे हायकोर्टाचे कल्चर) आहे का? अशी विचारणा केली. तुम्हीसुद्धा न्यायालयाची सभ्यता पाळणे आवश्यक आहे, असे मुख्य न्या. चेल्लुर यांनी म्हटल्यावर पत्रकारांनी काहीही न बोलता कोर्टरूम सोडणे पसंत केले. (प्रतिनिधी)