सरकारी कार्यालयात आता जीन्स पँट चालेल, टी शर्ट नाही; सामान्य प्रशासन विभागाचा नवा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 07:05 AM2021-03-17T07:05:00+5:302021-03-17T07:05:36+5:30
याआधी ८ डिसेंबरला परिपत्रक काढून सर्व महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी साडी, सलवार/चुडीदार, ट्राऊझर पँट व त्यावर कुर्ता अथवा शर्ट तसेच आवश्यकता असल्यास दुपट्टा असा पेहराव करावा.
मुंबई : मंत्रालय तसेच सर्व राज्य सरकारी कार्यालयांमध्ये जीन्स पँट आणि टी शर्ट घालून येऊ नये हा आधीचा आदेश सुधारून आता टी शर्ट घालून येऊ नये, जीन्स पँट चालेल, असा नवा आदेश सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी काढला.
याआधी ८ डिसेंबरला परिपत्रक काढून सर्व महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी साडी, सलवार/चुडीदार, ट्राऊझर पँट व त्यावर कुर्ता अथवा शर्ट तसेच आवश्यकता असल्यास दुपट्टा असा पेहराव करावा. पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, पँट/ट्राऊझर असा पेहराव करावा. गडद रंगाचे, चित्रविचित्र नक्षीकाम/ चित्रे असलेले पेहराव करू नयेत. तसेच, जीन्स पँट व टी-शर्टचा वापर कार्यालयांमध्ये करू नये, अशा मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.
अन्य पँट, ट्राऊझरप्रमाणेच जीन्स ही देखील पँट असते. मग तिला मनाई कशासाठी, अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांमध्ये उमटली होती. त्याची दखल घेत आता जीन्स पँटला असलेली मनाई उठविण्यात आली आहे. पोषाखाबाबत परिपत्रकातील अन्य सर्व बाबी लागू राहतील.
शासकीय, कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही ड्रेसकोड
- महिला कर्मचाऱ्यांनी कार्यालयात शक्यतो चपला, सँडल, बूट यांचा वापर करावा. पुरुष कर्मचाऱ्यांनी बूट, सँडलचा वापर करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
- राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी तसेच कंत्राटी तत्त्वावर नियुक्त कर्मचारी तसेच सल्लागार म्हणून कामासाठी येणाऱ्या व्यक्तींनाही हा ड्रेसकोड लागू असेल.