जेईई अॅडव्हान्स परीक्षेत पुण्याचा अक्षत चुघ दुसरा
By admin | Published: June 12, 2017 03:14 AM2017-06-12T03:14:15+5:302017-06-12T03:14:15+5:30
आयआयटीमध्ये प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या व अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आयआयटीमध्ये प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या व अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर झाला. यामध्ये पुण्याच्या अक्षत चुघ याने ३६६ पैकी ३३५ गुण मिळवून देशात दुसरा व राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. हरियाणातील पंचकुलचा सर्वेश मेहतानी याने देशात पहिला आणि दिल्लीच्या अनन्य अग्रवाल याने तिसरा क्रमांक मिळवला. मेहतानी
हा आयआयटी रुरकी तर चुघ हा आयआयटी मुंबई आणि अग्रवाल हा आयआयटी दिल्ली विभागाचा आहे. औरंगाबादच्या ओंकार देशपांडे याने देशात आठवा क्रमांक पटकावला आहे.
आयआयटीमधल्या विविध पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षेचे (जेईई अॅडव्हान्स) आयोजन केले जाते. जेईई अॅडव्हान्सची परीक्षा २१ मे २०१७ रोजी पार पडली. देशातील १ लाख ७ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. महाराष्ट्र राज्य मंडळाच्या १६ हजार ४७३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. अक्षत हा महंमदवाडीमधील दिल्ली पब्लिक स्कूलमधून बारावी उत्तीर्ण झाला आहे. सीबीएससी बोर्डामध्ये त्याला बारावीत ९८ टक्के गुण मिळाले. जेईईच्या प्रवेश परीक्षेत तो देशभरातून ७व्या स्थानावर होता. त्याला बॉम्बे आयआयटीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये ग्रॅज्युएशन करायचे आहे. त्याचे वडील टाटा कंपनीमध्ये अधिकारी आहेत, तर आई गृहिणी आहे. औरंगाबादच्या ओंकर देशपांडे याने मुंबई आयआयटीला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊन संशोधनाकडे वळणार असल्याचे ओंकारने सांगितले.
जेईई अॅडव्हान्स परीक्षा ही फिजिक्स (१२२ गुण), केमिस्ट्री (१२२) आणि मॅथ्स (११२ गुण) अशी एकूण ३६६ गुणांची घेतली जाते. मागील ११ वर्षांत यंदा पहिल्यांदाच जेईई अॅडव्हान्स परीक्षेचे पेपर तुलनेने सोपे काढण्यात आले होते. त्यामुळे यंदा परीक्षेचा कटआॅफ वाढला आहे. टॉप १०० रँक्समध्ये स्थान मिळवलेले २९ विद्यार्थी मद्रास, २६ विद्यार्थी दिल्ली, २५ विद्यार्थी मुंबई आणि ६ विद्यार्थी कानपूर विभागाचे आहेत.
देशभरातून १ लाख ७ हजार विद्यार्थ्यांपैकी किमान ३५ टक्के गुण मिळवणाऱ्या ४० हजार विद्यार्थ्यांना रँक देण्यात आली आहे. येत्या १९ जूनपासून देशभरातील प्रमुख २३ आयआयटी तसेच एनआयटीमध्ये त्यांना या परीक्षेतील रँकनुसार प्रवेश दिला जाणार आहे. यावर्षीची परीक्षा आयआयटी मद्रासने आयोजित केली होती.
पुण्यातील किरण भापकर (इतर मागासवर्गीय प्रवर्गातून आॅल इंडिया रँक १)चैत्राली दुसे (२८५ रँक), यश बुटला (३६० रँक), राधा लाहोटी (३६० रँक) यांनीही लक्षणीय यश मिळविले आहे.
राजेंद्र दर्डा यांच्याकडून अक्षतचे अभिनंदन
लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी अक्षत चुघ याचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले. भविष्यातही असेच उज्ज्वल यश संपादन करून महाराष्ट्राचे व देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.