जेईईचा अॅडव्हान्सचा कटआॅफ वाढला
By admin | Published: June 12, 2017 01:47 AM2017-06-12T01:47:37+5:302017-06-12T01:47:37+5:30
जेईई अॅडव्हान्स परीक्षेचे पेपर गेल्या ११ वर्षांच्या तुलनेत पहिल्यांदाच सोपे काढण्यात आले होते. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १० टक्क्यांनी कटआॅफ वाढला आहे
पुणे : जेईई अॅडव्हान्स परीक्षेचे पेपर गेल्या ११ वर्षांच्या तुलनेत पहिल्यांदाच सोपे काढण्यात आले होते. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १० टक्क्यांनी कटआॅफ वाढला आहे. देशभरातील २३ आयआयटीमध्ये ११ हजार ३२ जागा उपलब्ध असून, रँक मिळालेल्या ३० हजार विद्यार्थ्यांमध्ये तिथल्या प्रवेशासाठी स्पर्धा होणार आहे. या परीक्षेत पुण्यातील साधारणत: ३०० विद्यार्थ्यांना रँक मिळविण्यात यश आले आहे.
देशभरातून १ लाख ७१ हजार विद्यार्थी बसले होते. त्यापैकी
किमान ३५ टक्के गुण मिळविणाऱ्या ३० हजार विद्यार्थ्यांना रँक देण्यात आली आहे. पुण्याचा अक्षत चुघ हा देशात दुसरा आला, त्याचबरोबर
इतर अनेक विद्यार्थ्यांनी या
परीक्षेत यश मिळविले आहे. देशभरातून जेईई मेन्स परीक्षेसाठी बसलेल्या १२ लाख विद्यार्थ्यांपैकी १.३६ लाख विद्यार्थी महाराष्ट्रातून होते, त्यापैकी पुण्याचे १५ हजार विद्यार्थी होते. त्यातून जेईई
अॅडव्हान्स परीक्षेसाठी एक हजार विद्यार्थी पात्र ठरले होते.
मागील ८ वर्षांत पुण्यातील जेईई अँडव्हान्स परीक्षेत रँक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. २००१मध्ये केवळ २, तर २०१०मध्ये पुण्यातील विद्यार्थ्यांना केवळ १०० आयआयटी रँक प्राप्त झाल्या होत्या यंदाच्या वर्षी हा आकडा ३००पर्यंत पोहोचला आहे.
जेईई परीक्षेचे मार्गदर्शक दुर्गेश मंगेशकर यांनी सांगितले, ‘‘जेईई अॅडव्हान्स परीक्षा पर्यायी प्रश्नांवर आधारित झाल्यापासून गेल्या ११ वर्षांतील जेईई अॅडव्हान्स २०१७ची परीक्षा ही अत्यंत सोपी होती. अपेक्षेनुसार विशिष्ट रँकसाठीच्या कट आॅफ गुणांमध्ये वाढ झालेली आहे. उदा. २०१६ मध्ये आॅल इंडिया रँक २००० रँकसाठी ४३.५५%, तर २०१५ मध्ये ४९ % कटआॅफ होता. मात्र, यावर्षी हा कटआॅफ ६८% गुणांवर आला आहे.’’
जेईई अॅडव्हान्स परीक्षेत चाटे शिक्षण समूहाचे २२ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. सोहन सावंत,
शीतल बिजले, अनुप गुरव,
हितेश गुंजाल, अदिती खुर्द,
गार्गी पाटील, रोहन पाटील,
वर्षा सूर्यवंशी, स्नेहल कांबळे यांना रँक मिळविण्यात यश आले.