जेजुरी गड बनतेय पर्यटन केंद्र!
By Admin | Published: February 15, 2015 01:13 AM2015-02-15T01:13:27+5:302015-02-15T01:13:27+5:30
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या खंडेरायाचा जेजुरी गड परिसर आता पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला येत असून, वनखात्यातर्फे डोंगर सुशोभिकरण आणि वक्षारोपण करण्यात येत आहे़
बी.एम.काळे - जेजुरी (जि़पुणे)
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या खंडेरायाचा जेजुरी गड परिसर आता पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला
येत असून, वनखात्यातर्फे डोंगर सुशोभिकरण आणि वक्षारोपण करण्यात येत आहे़ जेजुरी हे तीर्थक्षेत्राबरोबरच पर्यटन केंद्र्र म्हणून विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे.
गेल्या वर्षी तत्कालीन वनमंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते जेजुरी गडालगतच्या २३ हेक्टर क्षेत्रावरील वृक्षारोपण व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ झाला. यात २० हजार वृक्षांची लागवड करणे, बालोद्यानाची निर्मिती, भाविकांना बसण्यासाठी झाडाभोवती ओटे बांधणे, पॅगोडा, निसर्ग निर्वाचन (अभ्यास) केंद्र उभारणे, वन्य प्राण्यांसाठी पाणवठे, वृक्षारोपणाबारोबरच डोंगर सुशोभीकरण, भाविकांना निसर्ग परिक्रमा करण्यासाठी पथ, रोपवनाला कुंपण आदी कामे केली जाणार आहेत.
उद्यानतज्ज्ञ सुहास जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभरात येथे वड, पिंपळ, लिंब, गुलामोहर, आपटा, चिंच, कांचन आदी सुमारे ६ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. निसर्गप्रेमीसाठी वन खात्याकडून दोन ठिकाणी पॅगोडा उभारला आहे. डोंगर पायवाटा तयार करण्यात आलेल्या आहेत, रोपवनाला कुंपण घालाण्याचेही काम सुरू आहे. राज्याचे मुख्य वन सचिव विकास खारगे यांनीही भेट देऊन या कामाची पाहणी केली आहे.
जेजुरीगड उंच डोंगरावर असून, तेथून पुढे दीड किलोमीटर जयाद्र्रीच्या डोंगररांगांत खंडोबा देवाचे मूळ ठिकाण कडेपठार मंदिर आहे. जेजुरीला येणारे भाविक गडावरील देवदर्शन घेतल्यानंतर डोंगरातील कडेपठार मंदिरातही जातात. कडेपठार आणि जेजुरीगड यांच्यामधील डोंगर हा वन खात्याच्या मालकीचा असल्याने वन खात्याने तीर्थक्षेत्र जेजुरीचा पर्यटन ठिकाण म्हणूनही विकास करण्यासाठी हा संपूर्ण डोंगरच विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.