जेजुरी ग्रामस्थांनी वाचला असुविधांचा पाढा

By admin | Published: July 22, 2016 01:17 AM2016-07-22T01:17:13+5:302016-07-22T01:17:13+5:30

लोहमार्गावरील महत्त्वपूर्ण असलेल्या ब्रिटिशकालीन जेजुरी रेल्वे स्थानकास प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी केली.

Jejuri villagers have read the inconveniences | जेजुरी ग्रामस्थांनी वाचला असुविधांचा पाढा

जेजुरी ग्रामस्थांनी वाचला असुविधांचा पाढा

Next


जेजुरी : पुणे ते कोल्हापूर या लोहमार्गावरील महत्त्वपूर्ण असलेल्या ब्रिटिशकालीन जेजुरी रेल्वे स्थानकास प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी केली. या वेळी उपस्थित असलेल्या स्थानिक ग्रामस्थांशी त्यांनी चर्चा केली. या वेळी ग्रामस्थांनी स्थानकात असलेल्या असुविधांचा पाढाच वाचला.
पुणे-कोल्हापूर रेल्वे मार्गावरील जेजुरी हे महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्राचे ठिकाण असल्याने राज्यातून व राज्याबाहेरून येणाऱ्या भाविकांचा ओघ वाढला आहे. मात्र, येथील रेल्वेस्थानकात सुविधांचा अभाव आहे. येथील रहिवासी व माजी नगरसेवक मेहबूब पानसरे, सुभाष दरेकर, विजय खोमणे, संजय माने, रोहिदास कुदळे यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाकडे सतत पाठपुरावा ठेवला आहे. तसेच केंद्र शासनाचे येथील रेल्वे मार्गाचे रुंदीकरण करण्याचे धोरण आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाचे मंडल रेल प्रतिबंधक बी. के. दादाभॉय, वरिष्ठ परिचालन प्रबंधक अशोककुमार तिवारी, निरीक्षक कौशलकुमार तिवारी, आरपीएफ निरीक्षक डी. के. पिल्ले, उपनिरीक्षक राममहेश पांडे, राहुल बनसोडे यांनी गुरुवारी (दि. २१) जेजुरी रेल्वे स्थानकास भेट देत पाहणी केली.
या वेळी रेल्वे स्थानकाचे स्टेशनमास्तर गुजरमल मीना, मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे, माजी नगरसेवक मेहबूब पानसरे, जयमल्हार पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाष दरेकर, विजय खोमणे, भाजपाचे सचिन पेशवे आदी उपस्थित होते.
रेल्वे स्थानक ब्रिटिशकालीन असून, येथील शेड पावसाळ्यात गळते. त्याची डागडुजी करणे गरजेचे आहे. येथील प्लॅटफॉर्मची उंची कमी असल्याने रेल्वेत चढ-उतार करताना प्रवाशांचा तोल जातो. यामुळे कित्येकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर, काही जण कायमचे अपंग झाले आहेत.
रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची वाढवावी. स्थानकात कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी पानसरे यांनी केली. जेजुरीत दररोज २०० ते ३०० भाविक रेल्वे मार्गाने देवदर्शनासाठी येतात. तसेच येथे औद्योगिक वसाहत विस्तारत आहे. त्या अनुषंगाने पुणे ते नीरा लोकलसेवा सुरू करावी व या लोकल सेवेला ‘मार्तंडविजय’ नाव द्यावे, अशी मागणी विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे यांनी केली. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मागण्या रास्त असून, याबाबत लवकरच वरिष्ठ पातळीवर निर्णय होणार असल्याचे सांगितले. ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ व खंडोबाची प्रतिमा देऊन अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या भेटीदरम्यान नगरपालिका प्रशासनाचा एकही अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हता, याचीच चर्चा होत होती. (वार्ताहर)
>अधिकारीवर्गाकडून ग्रामस्थांचे कौतुक
सुमारे पाच वर्षांपूर्वी रेल्वे स्थानकानजीक जोधपूरकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसला भीषण अपघात झाला असताना रेल्वे स्टेशननजीक राहणाऱ्या ग्रामस्थांनी अपघातामधील जखमींना डब्यातून बाहेर काढत रुग्णालयात उपचारासाठी पोहोचविण्यास मोलाची मदत केली होती. तर, इतर प्रवाशांना पाण्याच्या बाटल्या, जेवणाचे साहित्य पुरविले होते.
रेल्वे स्थानकात अपघात झाल्यास येथील रहिवासी मेहबूब पानसरे, संजय माने, विजय खोमणे, सुभाष दरेकर, रोहिदास कुदळे हे अपघातामधील जखमींना उपचारासाठी तातडीची मदत करतात; तसेच स्थानकातील असुविधांबाबत सतत पाठपुरावा ठेवला असल्याने त्यांचे उपस्थित अधिकाऱ्यांनी कौतुक करीत धन्यवाद दिले.

Web Title: Jejuri villagers have read the inconveniences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.