जेट एअरवेजला १.६० लाखांचा दणका
By admin | Published: February 9, 2017 05:31 AM2017-02-09T05:31:03+5:302017-02-09T05:31:03+5:30
स्वत:चे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ग्राहकाचे नुकसान करणाऱ्या आणि त्यांना योग्य पर्यायी व्यवस्थाही न करून देणाऱ्या
ठाणे : स्वत:चे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ग्राहकाचे नुकसान करणाऱ्या आणि त्यांना योग्य पर्यायी व्यवस्थाही न करून देणाऱ्या जेट एअरवेजला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ३५ हजारांच्या दंडासह ट्रीपचे आर्थिक नुकसान म्हणून १ लाख २५ हजार देण्याचे आदेश दिले आहेत.
मनीष पाटील यांनी कुटुंबीयांसह वैष्णोदेवी येथे जाण्यासाठी ४ मार्च २०१२ करिता जेट एअरवेजच्या सेवेची ३ तिकिटे बुक केली. ७ मार्चच्या परतीच्या प्रवासाचीही तिकिटे बुक केली होती. ४ मार्चच्या प्रवासासाठी पाटील २ तास आधी विमानतळावर चेकइन काउंटरवर पोहोचले असता त्यांना सिस्टीम फेल आणि नंतर आसने भरल्याचे सांगून बोर्डिंग पास दिला नाही. त्यानंतर, दुसऱ्या विमानाने जाण्यास सुचवले. मात्र, दुसरे विमान मुंबई ते दिल्लीच असल्याने पुन्हा तेथून जम्मूकरिता कनेक्टेड विमान नव्हते. त्यामुळे पाटील यांनी तो प्रस्ताव नाकारला आणि संपूर्ण खर्च वाया गेल्याने एअरवेजविरोधात मंचाकडे तक्रार दाखल केली. तर, विमानाचे ओव्हर बुकिंग झाल्याने पाटील यांनी प्रवास केलाच नाही. त्यामुळे ते आपले ग्राहक नाहीत. त्यांना पर्याय म्हणून मुंबई-दिल्ली व दिल्ली-जम्मू विमानाची सोय करून देतो अथवा प्रतिव्यक्ती ४ हजार नुकसानभरपाई देतो, असा प्रस्ताव आम्ही दिला होता. मात्र, त्यांनी तो नाकारला, असे जेट एअरवेजच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आले.
कागदपत्रे, पुरावे यांची पडताळणी केली असता, पाटील यांनी जेट एअरवेजच्या सेवेसाठी शुल्क भरून मधुरम ट्रॅव्हल्सतर्फे ३ तिकिटे कन्फर्म केल्याचा पुरावा अभिलेखावर आहे. पाटील यांना बोर्डिंग पास दिले नसल्याचे एअरवेजने मान्य केले आहे. दुसऱ्या प्रवाशांकडून अतिरिक्त बुकिंग घेतल्याने पाटील यांना शुल्क भरूनही आसने उपलब्ध झाली नाही, तर पाटील यांनी आरक्षण केलेल्या विमानाचे किती बुकिंग होते, याचा अहवाल मागवूनही एअरवेजने तो दिला नाही. परिणामी, पाटील यांना सदोष सेवा दिली आहे, असे मंचाने स्पष्ट केले. त्यामुळे जेट एअरवेजने पाटील यांना मानसिक त्रास व न्यायिक खर्च म्हणून ३५ हजार आणि ट्रीपचे आर्थिक नुकसान म्हणून १ लाख २५ हजार द्यावेत, असे आदेश मंचाने दिले आहेत. (प्रतिनिधी)