जेट एअरवेजला लागले पुन्हा उड्डाणाचे वेध
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 02:55 PM2023-08-01T14:55:53+5:302023-08-01T14:57:56+5:30
गेल्यावर्षी मे महिन्यातही कंपनीला परवाना प्राप्त झाला होता. मात्र, त्यावेळी अन्य प्रलंबित मुद्द्यांमुळे कंपनीला उड्डाण करणे शक्य झाले नाही.
मुंबई : जेट एअरवेज कंपनीला आता पुन्हा उड्डाणाचे वेध लागले असून, नागरी विमान महासंचालनालयाने (डीजीसीए) कंपनीला एअरपोर्ट ऑपरेटर प्रमाणपत्र दिले आहे. यामुळे कंपनीच्या उड्डाणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
गेल्यावर्षी मे महिन्यातही कंपनीला परवाना प्राप्त झाला होता. मात्र, त्यावेळी अन्य प्रलंबित मुद्द्यांमुळे कंपनीला उड्डाण करणे शक्य झाले नाही. परिणामी, कंपनीच्या परवान्याची मुदत मे महिन्यात संपली होती. त्याचे नूतनीकरण झाले असून, सध्या कंपनीचा ताबा ज्या जालान-कालरॉक समूहाकडे आहे, त्यांनी जेट एअरवेजच्याविमानांचे पुन्हा उड्डाण करण्याचे संकेत दिले आहेत.
१९९३ सुरू झालेली जेट एअरवेज कंपनी प्रवाशांना प्रीमियम सेवा देणारी विमान कंपनी म्हणून लौकिक राखून होती. मात्र, कंपनीची आर्थिक अवस्था दोलायमान झाल्यानंतर एप्रिल २०१९ मध्ये कंपनीने उड्डाण थांबवले होते. कंपनीच्या अनेक कर्मचाऱ्यांचे पगारदेखील थकले होते. कंपनीचे प्रकरण राष्ट्रीय विधी प्राधिकरणाकडे गेले होते. यानंतर कंपनीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी जालान-कालरॉक कंपनीला मिळाली.
ज्यावेळी कंपनी कार्यरत होती, त्यावेळी देशातील ६५ ठिकाणी तर आंतरराष्ट्रीय पातळीवर १२४ ठिकाणी कंपनीची विमाने उड्डाण करत होती.