राजू शेट्टी यांना न घेता उडालं जेट एअरवेजचं विमान
By admin | Published: June 14, 2017 01:00 PM2017-06-14T13:00:27+5:302017-06-14T13:49:18+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांना जेट एअरवेज या विमान कंपनीच्या हलगर्जीपणाला सामोरं जावं लागलं आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - विमान प्रवास करताना राजकीय नेते आणि विमान कंपन्यांमध्ये वादाच्या घटना वाढू लागल्या आहेत. शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड यांच्याप्रमाणेच खासदार राजू शेट्टी यांचा विमानतळावर जेट एअरवेजच्या कर्मचा-यांबरोबर वाद झाला. आज मुंबई ते दिल्ली असा प्रवास राजू शेट्टी यांना करायचा होता. त्यावेळी ही घटना घडली आहे. विमानातून प्रवास करताना राजू शेट्टी यांच्याकडे बोर्डिंग पास असूनही त्यांना विमानातून प्रवास करताच आला नाही.
खासदार राजू शेट्टी बुधवारी सकाळी 6 वाजताच्या विमानाने दिल्लीला जाणार होते. त्यासाठी त्यांनी बिझनेस क्लासचं तिकीट काढलं होतं. तसंच विमानाच्या एक तास आधीच ते विमानतळावरसुद्धा हजर होते. रितसर बोर्डिंग पास घेऊन ते वेळेच्या आधी लॉन्जमध्ये बसले आणि रजिस्टरमध्ये नोंद केली होती. यावेळी राजू शेट्टी यांच्यासह कोणीही मदतनीस नव्हता. काही वेळानंतर राजू शेट्टी बोर्डिंग करण्यासाठी लॉन्जच्या बाहेर आल्यावर त्यांना बोर्डिंग द्वार बंद झाल्याचं कळविण्यात आलं.राजू शेट्टी यांनी दिल्लीला एका महत्त्वाच्या बैठकीला जायचं होतं. त्यामुळे त्यांनी पर्यायी व्यवस्था करण्याची विनंती केली. त्यानंतर राजू शेट्टी यांना सात वाजताच्या विमानाचं बदली तिकीट दिलं पण त्यासाठी दोन हजार रूपये जेटने घेतले. आपली चूक नसल्याने याबाबत पैसे भरण्यास राजू शेट्टी यांनी नकार दिला पण जेटने त्यांचं काहीही ऐकलं नाही. अखेरीस त्यांनी पैसे भरले पण त्याची पावती मागितली. पण जेटकडून पावती न मिळाल्याने राजू शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकऱणी एअरपोर्ट अथॉरीटीकडे तक्रार करणार असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे. पण या प्रकऱणी जेट एअरवेजने अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
याआधी एअर इंडियाने योग्य वागणूक न दिल्याने शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांचा क्रु मेंबर्ससह वाद झाला होता. यावादात रविंद्र गायकवाड यांनी त्या कर्मचाऱ्याला चपलेनं मारल्याचीही घटना घडली. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पर्सनल सिक्युरिटीसह एअर इंडियाने प्रवास नाकारला होता त्यावर राज ठाकरे यांनीही नाराजी व्यक्त केली होती.