तब्बल १७ तास रंगला जेजुरीचा मर्दानी दसरा
By admin | Published: October 12, 2016 06:56 PM2016-10-12T18:56:40+5:302016-10-12T18:56:40+5:30
तीर्थक्षेत्र जेजुरीत अत्यंत धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक असा मर्दानी दसरा मंगळवारी जल्लोषात साजरा झाला. तब्बल १७ तास रंगलेल्या या सोहळ्याने हजारो भाविकांना वेगळीच अनुभूती देवून गेला.
ऑनलाइन लोकमत
जेजुरी, दि. 12 - तीर्थक्षेत्र जेजुरीत अत्यंत धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक असा मर्दानी दसरा मंगळवारी जल्लोषात साजरा झाला. तब्बल १७ तास रंगलेल्या या सोहळ्याने हजारो भाविकांना वेगळीच अनुभूती देवून गेला.
नवरात्राची सांगता आणि घराघरातील घट उठल्यानंतर काल (दि. ११) सायंकाळी ६ वाजता जेजुरीतील ग्रामस्थ, देवाचे मानकरी, खांदेकरी, तसेच सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी बाहेरून आलेल्या भाविकांनी जेजुरी गड व परिसर गर्दीने फुलून गेला होता. पेशव्यांच्या इशारतीने सोहळ्याला प्रारंभ झाला. भंडऱ्याच्या उधळणीत खांदेकरी माणकऱ्यांनी देवाच्या उत्सव मूर्तीची पालखी उचलली, भंडाऱ्याच्या उधळणीत देवाचा जयघोषात पालखीने गडकोटातील मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालीत पालखी बालदारीत नेण्यात आली.
भांडरगृहातून देवाच्या उत्सव मूर्ती सेवेकऱ्यांनी पालखीत ठेवल्या, सोहळ्याने सीमोल्लंघणासाठी गडकोटाबाहेर बंदुकीच्या फैरींच्या सलामीत कूच केले. या वेळी गडाच्या सज्जातून भाविकांनी मुक्तहस्ताने भंडाऱ्याची उधळण केल्याने मावळतीला गडकोटाला सुवर्ण नगरीचे स्वरूप आले होते. मुख्य प्रवेशद्वारातून सोहळा गडकोटाबाहेर आल्यानंतर गडाला प्रदक्षिणा घालून सोहळा रमण्याकडे निघाला. गडाच्या पाठीमागील बाजूस सोहळा विसावला. रात्री ७.३० च्या दरम्यान या ठिकाणी टेकडीवर व डोंगराच्या उतारावर महिला, अबालवृद्ध व भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, रात्री ९ वाजता मार्तंड भैरवाचे मुळ ठिकाण कडेपठार मंदिरातील उत्सव मूर्तींचा पालखी सोहळा ही सीमोल्लंघणासाठी निघाला. दोन्ही मंदिराच्यामध्ये जयाद्रीची दीड किलोमीटरची डोंगररांग असल्याने संपूर्ण डोंगरावर दोन्ही कडील विश्वस्त मंडळाकडून विजेचे तात्पुरते खांब उभे करून पुरेशा उजेडाची सोय केली होती. यामुळे संपूर्ण डोंगरावरील विद्यूत रोषणाई मनमोहक दिसत होती, दोन्ही ठिकाणी मोठी गर्दी होती. रात्रीच्या वेळी या सोहळ्यातील जल्लोष मदार्नी अनुभूती देत होता. यातच उत्सव मूर्तींच्या पालख्यांसमोर होणाऱ्या या विविधरंगी शोभेच्या दारूकामामुळे तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे सोहळ्याला एक ऐतिहासिक स्वरूप लाभले होते. शोभेच्या दारूकामाच्या लक्ख प्रकाशात जेजुरी गडाची पालखी डोंगर उतारावरून खाली दरीत रमण्याकडे उतरत होती, तर कडेपठार पालखी सुसरटिंगीच्या टेकडीवर चढत होती. पूर्णपने डोंगराळ भाग असल्याने खांदेकऱ्यांना पालखी सांभाळण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. त्यांच्या मदतीला धावणाऱ्या हातांना ही चढ उतारावर कसरत करावी लागत होती. मात्र उत्सवाचा जल्लोष आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे सारे काही सहजगत्या चालू होते, या वेळी वीरश्रीचा वेगळाच अनुभव उपस्थित भाविकाांना येत होता. मर्दानी दसरा सण काय असतो याचा अनुभव भाविकांना येत होता. देहभान हरपून भाविक उत्सवाची अनुभूती घेत होते.
मद्यरात्री जेजुरी गडाचा पालखी सोहळा रमण्यात पोहोचला, तर कडेपठारचा सोहळ्याने सुसरटींगी टेकडी सर केली. रात्री दीड वाजण्याचा सुमारास प्रचंड शोभेच्या दारूकामाच्या आतिषबाजीत दोन्ही सोहळ्यातील उत्सव मूर्तीची देव भेट उरकली. अन सोहळ्याने माघारीचे प्रस्थान ठेवले. देवभेटीचा विलोभनीय सोहळा उरकल्यानंतर जेजुरी गडाच्या पालखीचा सीमोल्लंघांनातून सोने लुटण्याचा सोहळा रंगला. रमन्यातील तळ्याकाठी सोने लुटून भाविकांनी उत्सवमूर्तीना अर्पण करून दसऱ्याचे पारंपारिक महत्व जपले. सोहळ्याने पहाटे पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास जुन्या जेजुरीमार्गे गावात प्रवेश केला. ठिकठिकाणचे औक्षण स्वीकारत सोहळा जेजुरी नगर पालिका पटांगणावर पोहोचला.
या ठिकाणी रावणदहन करण्यात आले. तेथून सोहळा मुख्य रस्त्याने गडकोटाकडे निघाला. वाटेत घराघरासमोर महिलांनी रांगोळ्या काढून सोहळ्याचे स्वागत केले. सकाळी ८ वाजता पालखी सोहळा गडाच्या पायऱ्यांची चढण चढून गडावर पोहोचला. सोहळ्यासमोरील सनई चौघडा, धनगरी ओव्या, सुंभरान, लोककलावंतांची भक्तीगीते, लावण्या, देवाची गाणी व नृत्य होत असल्याने विजयी उन्माद चांगलाच जाणवत होता. भंडारगृहात उत्सव मूर्ती विसावल्यानंतर पेशव्यांनी रोजमारा वाटप केले सोहळ्याची सांगता झाली.
खंडा (तलवार) कसरत स्पर्धेचा रोमांच...
दसरा उत्सवातील युवा वर्गाचा अत्यंत प्रिय सोहळा सुरू झाला. सुमारे ४२ किलोचा खंडा जास्तीत जास्त वेळ पेलून धरणे, त्याच्या कसरती करणे या स्पर्धेत सुमारे ५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यातील जास्तीत जास्त वेळ खंडा तोलून धरण्याच्या स्पर्धेत अमोल राजेंद्र खोमणे याने १६ मी. १२ सेकंद येवढा वेळ खंडा तोलून प्रथम क्रमाक मिळवला. तर अंकुश सुधाकर गोडसे (१३ मी.४१ से.), रमेश शेरे (१३ मी.१४ से.) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावले. सुहास खोमणे आणि राहुल गोडसे यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.
कसरतीच्या स्पर्धेत नितिन कुदळे याने प्रथम तर शिवाजी राणे याने दुसरा क्रमांक पटकावला. हेमंत माने याने तिसरा क्रमांक मिळवला, तर विशाल माने आणि अक्षय गोडसे यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. विजेत्यांना अनुक्रमे ११०००, ७७५१, ५५५१, तर उत्तेजनार्थ २००१ अशी रोख रक्कम व स्मृतीचिन्ह देण्यात आआले. या वेळी देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड. दशरथ घोरपडे, नगराध्यक्षा साधना दिडभाई, विश्वस्त डॉ. प्रसाद खंडांगळे, सुधीर गोडसे, संदीप घोणे, अड वसंत नाझिरकर, अड किशोर म्हस्के, व्यवस्थापक दत्तात्रय दिवेकर, समस्त ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे, जेजूरी पोलिस ठाण्याचे स. पो. नि. रामदास वाकोडे या वेळी उपस्थित होते.