पोलिसांच्या आत्महत्यांबाबत अपुऱ्या माहितीप्रकरणी झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 04:28 AM2019-06-04T04:28:39+5:302019-06-04T04:28:47+5:30
वरिष्ठांकडून कक्षप्रमुख फैलावर; तातडीने माहिती संकलित करण्याचे आदेश
मुंबई : राज्य पोलीस मुख्यालयात अधिकारी-अंमलदारांच्या आत्महत्यांसंदर्भातील अद्ययावत माहिती उपलब्ध नसल्याने, पोलीस वर्तुळातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित कक्षप्रमुखांना सोमवारी फैलावर घेतले. सर्व घटकांतून तातडीने माहिती संकलित करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
‘पोलिसांच्या आत्महत्याबाबत मुख्यालयच अनभिज्ञ’ या शीषर्कान्वये ‘लोकमत’ने सोमवार, ३ जून रोजी वृत्त प्रसिद्ध करून, मुख्यालयातील अधिकाºयांची उदासीनता चव्हाट्यावर आणली होती. २०१९ या वर्षातील पाच महिने पूर्ण झाले, तरी मुख्यालयात मात्र या संदर्भातील २०१६ पर्यंतचीच आकडेवारी उपलब्ध असल्याची बाब माहिती अधिकार कायद्यान्वये मिळालेल्या उत्तरातून उघड झाली होती.
या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्याने ते पोलीस वर्तुळात चर्चेचा विषय बनले. पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल मुंबईबाहेर असल्याने, अप्पर महासंचालक रजनीश सेठ (कायदा व सुव्यवस्था) यांनी सोमवारी कक्ष-२४चे वरिष्ठ कार्यासन अधिकारी महेंद्र पेडणेकर यांच्याकडून यासंबंधी सविस्तर अहवाल मागविला. तातडीने माहिती अद्ययावत करण्याची सूचना केली. यावेळी झालेल्या चर्चेत विशेष महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मिलीद भारंबे उपस्थित होते.