झोकात रंगला बोरीचा बार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 04:40 AM2017-07-29T04:40:19+5:302017-07-29T04:40:23+5:30
डफ तुतारीच्या निनादात आणि हलगीच्या कडकडाटात एकमेकींना शिव्यांची लाखोली वाहत परंपरेप्रमाणे यंदाही ‘बोरीचा बार’ शुक्रवारी उत्साहात साजरा झाला.
लोणंद (जि. सातारा) : डफ तुतारीच्या निनादात आणि हलगीच्या कडकडाटात एकमेकींना शिव्यांची लाखोली वाहत परंपरेप्रमाणे यंदाही ‘बोरीचा बार’ शुक्रवारी उत्साहात साजरा झाला. एकमेकींना पाऊणतास गावरान शिव्या हासडण्याचा ‘सुखसोहळा’ पार पडल्यावर सुखेड आणि बोरी या दोन्ही गावांतील यात्रांना सुरवात झाली.
सातारा जिल्ह्यातील सुखेड आणि बोरी (ता. खंडाळा) या दोन गावांमध्य नागपंचमीच्या दुसºया दिवशी हा बोरीचा बार रंगतो. दोन्ही गावांतील महिला गावच्या सीमेवरील ओढ्याजवळ जमतात आणि एकमेकींना शिव्या घालतात. यंदाही हा सोहळा उत्साहात पार पडला. दोन्ही गावातील शेकडो महिलांनी वाजतगाजत ग्रामदेवताचे दर्शन घेऊन पूजा केली. त्यानंतर वेशीवरच्या ओढ्याच्या कोरड्या पात्रात दोन्ही गावच्या महिला जमल्या आणि ‘बोरीचा बार’ सुरू झाला. गावात सहजपणे एकमेकींना दिल्या जाणाºया शिव्यांपासून सुरू झालेला हा सोहळा रंगत, रंगत शेवटी खास ठेवणीतल्या शिव्यांवर आला. इकडच्या बाजूने शिवी हासडल्यानंतर हलगीचा कडकडाट होणार. त्यानंतर तिकडच्या बाजूने शिवी हासडली जाणार आणि हलगीचा कडकडाट होणार. एकमेकींना हातवारे करीत उस्फूर्तपणे शिव्या देण्यात आल्या.
दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी सुरू झालेला शिव्या देण्याचा कार्यक्रम पाऊण तास चालला. जगावेगळा हा सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्याच्या विविध भागातून शेकडो लोकांनी गर्दी केली होती. अनेक तरुणांनी सोहळा आपल्या मोबाईलमध्येही कैद केला. या सोहळ्यानंतर दोन्ही गावांमध्ये यात्रेला सुरुवात झाली. लोणंदचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
महिलांना आवरताना पोलिसांची कसरत
डफ-तुतारी आणि हलगीच्या कडकडाटात एकमेकींना शिव्या देणाºया महिलांना आवरताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागत होती. बघ्यांची गर्दी, मोबाइलवर फोटो शूटिंग करणाºयांची गर्दी यांना आवर घालताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. यात्रेमुळे बोरीत मिठाईची दुकाने व पाळणे गावात लागले होते.