झारखंडच्या निकालानंतर शरद पवारांचा मोदी आणि भाजपाला टोला, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 04:48 PM2019-12-23T16:48:39+5:302019-12-23T17:45:37+5:30
झारखंडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या स्पष्ट बहुमतानंतर भाजपाची हरियाणा आणि महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत पिछेहाट झाली होती. आता वर्षाच्या अखेरीस झारखंडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे. दरम्यान, झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी भाजपाला टोला लगावला आहे. झारखंडच्या जनतेने भाजपाला नाकारले आहे. संधी मिळताच देशातील इतर मतदारही झारखंडप्रमाणेच कौल देतील, असे शरद पवार म्हणाले.
झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांसी संवाद साधला. ''भाजपावर जनतेची नाराजी आहे हे या निकालांमधून दिसत आहे. आज लागलेल्या निकालांमधून झारखंडच्या जनतेने भाजपाला नाकारले आहे. संधी मिळताच देशातील इतर मतदारही झरखंडप्रमाणेच कौल देतील. या निकालांसाठी मी झारखंडमधील जनतेचे आभार मानतो.''असे शरद पवार म्हणाले.
NCP Chief Sharad Pawar: The result of #JharkhandAssemblyPolls that has come today clearly states that people are with non-BJP parties. After Rajasthan, Chhattisgarh and Maharashtra, people have decided to keep BJP away from power in Jharkhand also. pic.twitter.com/i3VVuKiDP7
— ANI (@ANI) December 23, 2019
''झारखंडसह, महाराष्ट्र मध्यप्रदेश, छत्तीसगड, राज्यस्थान या पाच राज्यातून भाजपा हद्दपार झाली आहे. झारखंड या राज्यात आदिवासी व गरीब लोकांची संख्या जास्त आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारची वापरली गेलेली शक्ती आणि आर्थिक ताकद यांना न जुमानता इथल्या जनतेने भाजपाला नाकारले आहे,''' असेही शरद पवार यांनी सांगितले.
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये सत्ताधारी भाजपाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या महाआघाडीने स्पष्ट बहुमतासह सत्ता खेचून आणली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार आघाडीवर आहे.