कवठेमहांकाळमध्ये आर्चीसाठी तरु णाईचे ‘झिंगाट’
By Admin | Published: May 10, 2016 03:52 AM2016-05-10T03:52:50+5:302016-05-10T03:52:50+5:30
अवघ्या महाराष्ट्रातील युवावर्गाला वेड लावणाऱ्या ‘सैराट’फेम आर्चीला पाहण्यासाठी कवठेमहांकाळमध्ये सोमवारी गर्दीचा ‘सैराट’ प्रयोग पाहायला मिळाला.
अर्जुन कर्पे, कवठेमहांकाळ
अवघ्या महाराष्ट्रातील युवावर्गाला वेड लावणाऱ्या ‘सैराट’फेम आर्चीला पाहण्यासाठी कवठेमहांकाळमध्ये सोमवारी गर्दीचा ‘सैराट’ प्रयोग पाहायला मिळाला. गर्दी नियंत्रणाबाहेर जाऊ लागल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. अभिनेत्री आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरू कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्यावर ‘सैराट’वर स्वार झालेली तरुणाई अक्षरश: झिंगाट झाली.
कवठेमहांकाळ (जि.सांगली) येथे सोमवारी एका कापड दुकानाचे उद्घाटन रिंकू राजगुरू हिच्या हस्ते ठेवण्यात आले होते. गावात आर्ची येणार, ही बातमी आठवडाभर सोशल मीडियावरून अगोदरच पसरली होती. आर्चीला पाहण्यासाठी कवठेमहांकाळमध्ये सकाळपासूनच सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जत, मिरज, आटपाडी, कर्नाटकातून अनेक तरु णांनी हजेरी लावली होती. सोमवारी सकाळी अकरा वाजता रिंकू कार्यक्रमाच्या ठिकाणी आली असता, युवावर्गाने प्रचंड गर्दी केल्याने रिंकूला गाडीतून उतरणेही कठीण झाले. यावेळी गर्दी हटविण्यासाठी पोलिसांना जमावावर सौम्य लाठीमार करावा लागला. त्यानंतर रिंकूला कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिसांनी व तिच्या खासगी रक्षकांनी आणले. तोपर्यंत संपूर्ण गर्र्दी ‘सैराट’मय होऊन ‘झिंग, झिंग, झिंगाट’च्या तालात नाचत होती.
गर्र्दी प्रचंड झाल्याने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करूनही गर्दीला आटोक्यात आणता आले नाही. अर्ध्या तासात मोठी गर्दी झाल्याने पोलिसांना गर्दीला पांगविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. यावेळी रिंकू राजगुरूला मोठ्या प्रयत्नाने पोलिसांनी गर्दीतून वाट काढून देत शहरातून सुखरूप बाहेर काढले. तिची गाडी गर्दीतून बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले.
यावेळी गाडीचा आरसा फुटला. रस्त्यावर पडलेल्या आरशाच्या तुकड्यातही तरुणाई आर्चीची छबी शोधत होती. (वार्ताहर)