जिया खान खटला; सुनावणीला स्थगिती
By admin | Published: June 28, 2017 01:33 AM2017-06-28T01:33:40+5:302017-06-28T01:33:40+5:30
जिया खान आत्महत्या प्रकरणाचा खटला चालविण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीला सीबीआयने
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जिया खान आत्महत्या प्रकरणाचा खटला चालविण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीला सीबीआयने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी महाअधिवक्ते उपस्थित नसल्याने उच्च न्यायालयाने या खटल्याला १३ जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे.
न्या. अनिल मेनन यांनी १९ जून रोजी जिया खान आत्महत्या प्रकरणाच्या खटल्याला एका आठवड्याची स्थगिती देताना राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. मात्र मंगळवारच्या सुनावणीत राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी महाअधिवक्तेच न्यायालयात उपस्थित नसल्याने न्या. मेनन यांनी खटल्याला स्थगिती दिली.
‘या प्रकरणात दोन तपास यंत्रणा सहभागी आहेत. सीबीआयने दाखल केलेल्या केसमध्ये सरकारला विशेष सरकारी वकील नेमण्याची मुभा आहे का? हा प्रश्न उपस्थित केला,’ असे न्या. ए. के. मेनन यांनी गेल्या सुनावणीत म्हटले होते.
विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीनंतर सत्र न्यायालयाने सीबीआयला याबाबत अर्ज करण्याची परवानगी दिली नाही, असे सीबीआयचे वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले.
राबिया यांनी यापूर्वी सीबीआयविरुद्ध केस लढवण्यासाठी नियुक्त केलेल्या वकिलाचीच सरकारने खटला चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली, अशी माहिती वेणेगावकर यांनी न्यायालयाला दिली होती. यावर सरकार सीबीआयवर विशेष सरकारी वकील लादू शकते का,’ असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आहे.