जिया खान आत्महत्या प्रकरण : सूरजच्या पासपोर्ट याचिकेवर उत्तर द्या
By admin | Published: March 9, 2016 05:40 AM2016-03-09T05:40:41+5:302016-03-09T05:40:41+5:30
बॉलीवूड अभिनेत्री जिया खान हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या अभिनेता सूरज पांचोली याने पासपोर्ट परत मिळावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली आहे.
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री जिया खान हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या अभिनेता सूरज पांचोली याने पासपोर्ट परत मिळावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयाने सीबीआयला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
जिया खान आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केल्याची माहिती सरकारी वकिलांनी न्या. मृदुला भाटकर यांना दिल्यानंतर त्यांनी सीबीआयला या प्रकरणी उत्तर देण्याचे निर्देश दिले. या अर्जावर आता बुधवारी सुनावणी होणार आहे.
व्यावसायिक कारणास्तव परदेशात जायचे आहे. त्यासाठी पासपोर्ट देण्याचे आदेश तपास यंत्रणेला द्यावेत. परदेशातून भारतात परत आल्यानंतर पासपोर्ट तपास यंत्रणेकडे परत करेन, असेही पांचोलीने अर्जात
म्हटले आहे.
३ जून २०१३ रोजी जिया खानने तिच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी तिचा प्रियकर अभिनेता सूरज पांचोली याला १० जून २०१३ रोजी अटक करण्यात आली. जियाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा
गुन्हा त्याच्यावर नोंदवण्यात आला आहे. २ जुलै रोजी सूरजची जामिनावर सुटका करण्यात आली.
मात्र जियाची आई राबिया खान हिने या प्रकरणाचा तपास स्वतंत्र तपास यंत्रणेकडे वर्ग करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांनी केलेल्या याचिकेमुळे उच्च न्यायालयाने जुलै २०१४मध्ये या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केला.
सीबीआयनेही तपास केल्यानंतर ही हत्या नसून आत्महत्या आहे, असे म्हणत सूरज पांचोलीवर जियाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल आरोपपत्र दाखल केले
आहे. (प्रतिनिधी)