जिद्द : दोन्ही हात नसतांनाही करतो टेलरींगचा व्यवसाय
By Admin | Published: September 11, 2016 07:58 PM2016-09-11T19:58:34+5:302016-09-11T19:58:34+5:30
अपघातानंतर दोन्ही हात गमावलेल्या शत्रुघ्नने आपल्या कर्तव्यातून समाजासमोर जिद्द आणी चिकाटीचा नवीन आदर्श ठेवला आहे.
नाना हिवराळे
खामगाव (जि.बुलडाणा) - आयुष्यामध्ये नैराश्य, संकटे आली की, माणुस आत्महत्येचा पर्याय शोधतो स्वत:च्या पराभवाची हार माणुन दुसऱ्यावर खापर फोडणारे अनेक जण दिसुन येतात. मात्र अपघातानंतर दोन्ही हात गमावलेल्या शत्रुघ्नने आपल्या कर्तव्यातून समाजासमोर जिद्द आणी चिकाटीचा नवीन आदर्श ठेवला आहे. त्याची ही कृती समाजातील प्रत्येकाला दिशा देणारी ठरणार आहे.
शेगाव तालुक्यातील डोलारखेड येथील शत्रुघ्न शामराव देठे (वय ४२) यांची यशोगाथा धडधाकट्यांना प्रेरीत करणारी आहे. शेतकरी कुटंबांत जन्मलेल्या शत्रुघ्नने बारावीचे शिक्षण संपल्यानंतर टेलरींग शिकण्याला सुरुवात केली नांदुरा येथे टेलरींग शिकण्यासाठी दररोज येणे जाणे सुरु होते. १९९८ मध्ये शेगाव येथुन नांदुरा येथे रेल्वे ने जात असतांना अळसणा गावाजवळ शत्रुघ्न रेल्वेमधुन पडला या अपघातात त्याला दोन्ही हात गमवावे लागले. आयुष्याची जिवनाची सुरुवात होत असतांनास हाताचे मनगट तुटुन पडल्याने शत्रुघ्नला जिवनाची संध्याकाळ दिसत होती.
आई वडील शेतीत काम करुन प्रसंगी शेतमजूरी करून कुटुंबांचा गाडा चालवीतात. त्यांनाच जिवनाचा भार सोसावा लागणार या काळजीने शत्रुघ्न स्वत:लाच पाहत होता. मात्र अशाही परिस्थीतीत नैराश्यने खचुन न जाता शत्रुघ्नने आपला टेलरींगचा व्यवसायच आपला तारणहार असल्याचे समजून या व्यवसायाकडे वळला. त्यांच्यातील कला पुन्हा जिवंत करुन शत्रुघ्नने शक्कल लढवून कात्री हातात घेतली सुरुवातीला सर्वांनीच त्याच्या या कामाला वेड्यात काढले. परंतू तरीही हार न मानता त्याने टेलरींगचा व्यवसाय सुरु केला. दोन्ही हात नसतांना पायात कात्री घेवून कपडे कापणे, कपडे शिवणे तसेच वरलॉक मशीन चालवून शत्रुघ्न कपडे बनवीत आहे. त्याचे लग्न झाले असून त्यांना चार मुली आहेत. पत्नी सिंधुताई दिवसभर शेतात काम करुन सायंकाळी घरी आ ल्यावर पतीला या कामात मदत करते. तिच्या सहकार्यानेच शत्रुघ्न या आयुष्याच्या वळणावर झेप घेत आहे.
सुईत धागा वळला अन शत्रुघ्नचे लग्न ठरले.
दोन्ही हातांना अपंग असलेल्या शत्रुघ्नला लग्नासाठी मुलगी मिळणार की नाही याची साशंकता होती. मात्र नातेवाईकांनी मुलगा अपंग असतांनाही होतकरु आहे. या बळावर मुली पाहणे सुरु केले. शेवटी नांदुरा तालुक्यातील कोळंबा येथे मुलगी पाहण्यासाठी गेले असता मुलीकडच्या मंडळींनी मुलाला सुईत धागा वळुन दाखावा अशी अट घातली. यावेळी शत्रुघ्न केवळ सुईत धागा टाकुन नव्हे तर चक्क कपडे शिवुन दाखवले. यामुळे मुलीकडील पाहुणे थक्क झाले व येथेच लग्न जुळले.
१८ वर्षापासून रामनामाचा जप
अपघातानंतर दोन्ही हात गमावलेल्या शत्रुघ्नने जिवनाची दिशा ठरवली. त्याची दिनचर्या सामान्यांना लाजवीणारी आहे. पहाटे साडे तीन वाजता पासून शत्रुघ्नची दिनचर्या सुरु होते. पहाटे चार ते सहा वाजेपर्यंत गावातीलच हनुमान मंदीरात दररोज नित्य नियमाने रामनामाचा जप शत्रुघ्न करीत आहे. त्याने आता पर्यत ४६ रजीष्टर मध्ये राम नामाचे अक्षर लिहून भक्ती भाव दाखवीला आहे.
जिवनात कितीही कठीण परिस्थीती आली तरीही माणसाने खचुन न जाता धैर्याने आलेल्या संकटाचा सामना करावा. परिस्थीतीला सामोरे जाता माणूस जिवनात नक्कीच यशस्वी होतो. माझा आजच्या तरुण पिढीला हाच संदेश आहे.
- शत्रुघ्न देठे,
डोलारखेड ता. शेगाव