जिद्दीला सलाम ! हार्ट ब्लॉकेज असतानाही पूर्ण केली अवघड मॅरेथॉन

By admin | Published: June 5, 2017 04:36 PM2017-06-05T16:36:40+5:302017-06-05T17:03:48+5:30

जिद्द, ध्येय आणि कुटुंबीयांची साथ सदैव असेल तर कुणालाही कोणतीही गोष्ट साध्य करताना अडथळा येऊ शकत नाही.

Jiddly salute! Difficult marathon done despite heart blockage | जिद्दीला सलाम ! हार्ट ब्लॉकेज असतानाही पूर्ण केली अवघड मॅरेथॉन

जिद्दीला सलाम ! हार्ट ब्लॉकेज असतानाही पूर्ण केली अवघड मॅरेथॉन

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - जिद्द, ध्येय आणि कुटुंबीयांची साथ सदैव असेल तर कुणालाही कोणतीही गोष्ट साध्य करताना अडथळा निर्माण होऊ शकत नाही.  याचंच उदाहरण पाहायला मिळालं जगप्रसिद्ध असणा-या कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्तानं.
कठीण स्तरावरील यंदाच्या कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धेसाठी भारतातून एकूण 80 जणांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये मुंबईतील दादर येथील रहिवासी अनंत पुरव हेदेखील एक होते. विशेष बाब म्हणजे पुरव पहिल्यांदाच या मॅरेथॉनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. केवळ सहभागीच नाही झाले तर वयाच्या 55व्या वर्षी 87 किलोमीटरची असलेली ही स्पर्धा त्यांनी 11 तास 55 मिनिटांमध्ये पूर्ण करण्याची कौतुकास्पद कामगिरीही केली. 
 
न धावण्याचा डॉक्टरांचा सल्ला
कौतुकास्पद यासाठी कारण वैद्यकीय तपासणीमध्ये पुरव यांना हृदयाला रक्तपुरवठा करणा-या दोन रक्तवाहिन्या 70 ते 75 टक्के बंद झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे कॉम्रेड्स स्पर्धेत धावणं आपल्या आरोग्यासाठी कितपत योग्य असेल?, याची विचारणा करण्यासाठी पुरव यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला होता. मात्र, अशा परिस्थिती धावणं धोक्याचं ठरेल असे जवळपास सहा डॉक्टरांनी पुरव यांना सांगत न धावण्यासाठी सक्त मनाई केली होती. 
 
अशातच दोन वर्षांपूर्वी त्यांच्या मणक्याचंही मोठे ऑपरेशनदेखील झाले होते. सहा डॉक्टरांचा नकार घेऊनही पुरव यांची स्पर्धेत धावण्यासाठीची जिद्द काही केल्या कमी होत नव्हती.  मग काय ठरवल्याप्रमाणे त्यांनी स्पर्धेत भाग घेतला. एवढंच नाही तर शेवटपर्यंत त्यांनी स्पर्धेतून माघार घेतली नाही. यावेळी पुरव यांचा आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन कामी आला असवा, असंच म्हणावं लागेल. याच सकारात्मक दृष्टीकोनातून त्यांनी अवघडातील अवघड कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्णही केली. 
 
पुरव यांना कशी जडली धावण्याची गोडी?
वयाच्या 50व्या वर्षी अनंत पुरव यांनी धावायला सुरुवात केली. धावण्याची सवय अंगवळणी पाडताना आपल्याला कोणत्याही धावण्याच्या किंवा एखाद्या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे, असा कोणताही विचार त्यांनी कधीही केला नव्हता. जसाजसा धावण्याचा सराव वाढत गेला तसंतसे त्यांची धावण्याची आवड वाढत गेली. नियमित सरावातून त्यांची धावण्याची क्षमताही वाढू लागली.  यानंतर पुरव यांनी मुंबई मॅरेथॉन , हैद्राबाद मॅरेथॉन, दिल्ली मॅरेथॉन, गोवा मॅरेथॉन, सातारा हिल मॅरेथॉन यांसारख्या मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्णही केल्या. 
 
कॉम्रेड्स मॅरेथॉनचे स्वरुप
1921 पासून  कॉम्रेड्स मॅरेथॉनला सुरुवात झाली. डर्बन ते पीटर्स मारीबर्ग दरम्यान डोंगराळ भागात ही मॅरेथॉन आयोजित केली जाते. डर्बन ते पीटर्समारीबर्ग हा संपूर्ण प्रवास चढाईचा असल्याने धावपटूंची मेहनत पणाला लागते.   स्पर्धेतील साधारणतः 79 किलोमीटरचा भाग हा चढाईच असतो.  
 
या स्पर्धेमध्ये जेवढी मेहनत पुरव यांनी घेतली तेवढीच मेहनत त्यांची पत्नी अश्विनी पुरव यांचीही आहे. कारण दैनंदिन आयुष्यात अश्विनीच अनंत पुरव यांच्या पथ्यपाण्याची जबाबदारी काटेकोरपणे पार पाडत होत्या व सदैव भक्कमपणे त्यांच्या पाठिशी उभ्या होत्या. 
 
एकूणच जिद्द, मेहनत, चिकाटी व महत्त्वाचे म्हणजे कौटुंबिक आधाराच्या बळावर अनंत पुरव यांनी कॉम्रेड्स मॅरेथॉन यशस्वीरित्या पार पाडली.  
 
 

Web Title: Jiddly salute! Difficult marathon done despite heart blockage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.