जिगर ठक्कर यांची आत्महत्या आर्थिक अडचणीतूनच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 03:46 AM2018-03-01T03:46:57+5:302018-03-01T03:46:57+5:30
गोसीखुर्द जलसिंचन घोटाळ्यातील आरोपी जिगर ठक्कर (४१) याच्या आत्महत्येप्रकरणी तीन जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. आर्थिक अडचणीमुळे गेल्या काही दिवसांपासून ते तणावात असल्याची...
मुंबई : गोसीखुर्द जलसिंचन घोटाळ्यातील आरोपी जिगर ठक्कर (४१) याच्या आत्महत्येप्रकरणी तीन जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. आर्थिक अडचणीमुळे गेल्या काही दिवसांपासून ते तणावात असल्याची माहिती तिघांच्याही जबाबातून समोर येत आहे. त्याच्या गाडीतून ताब्यात घेतलेल्या कागदपत्रांची अधिक तपासणी सुरू आहे.
जिगर ठक्कर यांच्या गाडीवर सुनील सिंग आणि संतोष मिश्रा हे दोघे २० वर्षांपासून चालक म्हणून काम करतात. मंगळवारी सुनील गाडी चालवित होता. अनेकदा कामकाजाबाबत चर्चा करायची असल्यास, गाडी पार्क करून चालकांना ‘बेटा बाहर जाओ’ असे ते सांगत. त्यानुसार, चालक गाडीच्या बाहेर जाऊन थांबत असे. मात्र, ते गाडी सोडून लांब जात नसत. ठक्कर यांनी गाडी सोडताच, ते पुन्हा गाडीकडे येत होते, अशी माहिती संतोष मिश्रा याने दिली.
मंगळवारी जिगर यांच्या सांगण्यावरून सुनीलने त्यांची गाडी मरिन प्लाझा येथे पार्क केली. जिगर यांनी त्याला बाहेर जाण्यास सांगितले. तो नेहमीप्रमाणे बाहेर जाऊन थांबला, तोच त्यांनी जवळील रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून घेतली. डोक्यात अडकलेली गोळी आणि रिव्हॉल्व्हर पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविले आहे.
जिगर ठक्कर याचा मुलगा ध्रुव, भाऊ विशाल आणि चालक सुनील सिंग या तिघांचा जबाब नोंदविला आहे. तिघांच्याही जबाबातून जिगर आर्थिक अडचणीमुळे तणावाखाली होता. त्याच्यावर कोट्यवधीचे कर्ज होते. त्यातच गोसीखुर्द घोटाळ्यातूनही सुटण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. त्यातून मार्ग निघत नसल्याने अखेर त्यांनी जीवन संपविले.
रात्री उशिराने होणार अंत्यसंस्कार
घाटकोपर परिसरातील आशीर्वाद बंगल्यात ठक्कर कुटुंबीय राहतात. जिगर यांची बहीण अमेरिकेतून रात्री उशिराने येणार असल्याने, पार्थिवावर रात्री उशिराने अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती कुटुंबियांनी दिली आहे.