जिजाऊंची दूरदृष्टी सर्वांसाठी प्रेरणादायी - राजेश टोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 07:30 PM2021-01-12T19:30:44+5:302021-01-12T19:34:47+5:30
Jijau Janmotsaw कणखर राजमाता आणि लोकमाता म्हणूनही जिजाऊंकडे पाहीले पाहीजे, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी येथे केले.
- मुकुंद पाठक
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेड राजा: प्रजाहित जाणणारा राजा ज्या माऊलीने घडविला. त्या जिजाऊच्या भूमितून कायमच प्रेरणा मिळत आली. कणखर राजमाता आणि लोकमाता म्हणूनही जिजाऊंकडे पाहीले पाहीजे, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी येथे केले. जिजाऊ जयंती निमित्त जिजाऊ सृष्टीवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याच कार्यक्रमात आरोग्य क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल मराठा सेवा संघाच्यावतीने दिला जाणारा मराठा विश्वभूषण पुरस्कार ना. टोपे यांना देण्यात आला. आपले मनोगत आणि सत्काराला उत्तर देताना ना. टोपे यांनी हा सत्कार अथवा हा पुरस्कार आपल्या एकट्याचा नसून, आपल्या सोबत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या काम केलेल्या प्रत्येकाचा आहे. असे सांगितले. जिजाऊ जयंती हा एक जिजाऊ प्रेमींसाठी उत्साहाचा दिवस आहे. संकटाला सामोरे जायला कणखर पणा लागतो. संकटं झेलण्याची शक्ती लागते. ती शक्ती तो कणखरपणा राजमाता जिजाऊंनी शिवरायांना दिला आणि तोच संदेश आपल्यासाठी देखील आहे. त्यामुळे जिजाऊंच्या विचारांची प्रेरणा प्रत्येकांने घ्यावी, असे ते म्हणाले. आपल्याला मिळालेला हा पुरस्कार आपण राज्यातील कोरोना योध्दे, कोरोना काळात काम करणाºया प्रत्येकाला अर्पण करतो, असे भावपूर्ण उद्गारही त्यांनी यावेळी काढले. जिजाऊ सृष्टीच्या विकासासाठी सहकार्य करणार असल्याचेही ते शेवटी म्हणाले.
बुलडाण्यात वैद्यकीय महाविद्यालय
० जिजाऊ सृष्टीवरील मुख्य कार्यक्रमात आयोजकांनी जिजाऊ सृष्टीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्याची मागणी केली. आपल्या भाषणात याविषयी बोलताना ना. टोपे यांनी महाविद्यालय बुलडाण्यात मिळेल. त्याचं स्थान मात्र सिंदखेडच असेल, असे नाही असेही त्यांनी सूचित केले.
जिजाऊ सृष्टीवरील चित्र पाहून मनाला हुरहुर : ना. डॉ. शिंगणे
जिजाऊ सृष्टीवरील आजचे चित्र पाहून, मनाला हुरहुर वाटते, अशा शब्दात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सावित्री,जिजाऊ दशरात्रोत्सव आणि १४ जानेवारीला येणारा संत चोखामेळा यांच्या जयंतीपर्यंत या परिसरात रेलचेल असते. आजचा उत्सव कोरोनाचे निकष पाळत साजरा केला गेला. याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यापुढील काळात कोरोना सारखी परिस्थिती येऊ नये, अशी प्रार्थनाही त्यांनी राजमाता जिजाऊ चरणी केली. राजकारणाच्या संदर्भाने बोलताना ना. शिंगणे यांनी सत्तेचा मोह न करता कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रत्येकानं समाजोन्नीचं काम केलं पाहीजे, असे आवाहन केले. दरम्यान,आ. श्वेता महाले यांनी आपल्या भाषणात जिजाऊ सृष्टी विकासासाठी मागणी केली होती. त्याला उत्तर देताना शिंगणे यांनी केंद्र सरकारने आधी जीएसटीचे पैसे द्यावेत. जेणेकरून आर्थिक दृष्ट्या अडचणीत असलेले राज्य सरकार अनेक विकासाचे निर्णय घेऊ शकेल, अशी कोपरखळीही त्यांनी हाणली. जिजाऊ सृष्टीच्या विकासासाठी २५० कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. त्याचसोबतच सिंदखेड राजाच्या विकासासाठी ३११ कोटींचा प्रस्तावही सरकारकडे पडून आहे. या दोन्ही कामांसाठी आपण प्रयत्न करणार असल्याच ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.