विधानसभेत जिंतूरमध्ये पुन्हा आजी-माजी आमदारांमध्ये चुरस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 12:37 PM2019-07-23T12:37:40+5:302019-07-23T12:43:36+5:30
युतीत ही जागा भाजपकडे तर आघाडीत राष्ट्रवादी पक्षाकडे राहणार असल्याचे ठरले असल्याची चर्चा आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहेत. त्यामुळे सर्वच पक्षातील इच्छुकांनी तयारी सुरु केली आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर मतदारसंघात यावेळी पुन्हा आजी-माजी आमदार यांच्यात लढाई होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि राष्ट्रवादीचे विद्यामान आमदार विजय भांबळे यांच्यातच पुन्हा मुख्य लढत होणार असल्याची चर्चा आहे.
गेल्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी वेगवेगळे आपले उमदेवार रिंगणात उतरवले होते. जिंतूरमध्ये काँग्रेसकडून रामप्रसाद बोर्डीकर, राष्ट्रवादीकडून विजय भांबळे, शिवसेनेचे राम खराबे पाटील व भाजपाचे संजय साडेगावकर रिंगणात होते. मात्र खरी लढत बोर्डीकर आणि भांबळे यांच्यात झाली. भांबळे यांनी यावेळी विजय मिळवला होता. पुढे बोर्डीकर यांनी काँग्रेसचे हात सोडून कमळ हातात घेतले. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात मुख्य लढत होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे.
युतीत ही जागा भाजपकडे तर आघाडीत राष्ट्रवादी पक्षाकडे राहणार असल्याचे ठरले असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून आमदार भांबळे यांच्या वेतिरिक्त उमदेवारीसाठी एक ही अर्ज आला नसल्याने त्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. तर भाजपकडून रामप्रसाद बोर्डीकर यांनी दावा केला आहे. तसेच मागच्यावेळी झालेल्या पराभवाचा वचका काढण्याचा बोर्डीकर यांनी ठरवले असल्याचे बोलले जात आहे.
२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत परभणी मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून आमदार विजय भांबळे यांना उमदेवारी देण्यात आली होती. मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी जिंतूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून रामप्रसाद बोर्डीकर आमदार होते. मात्र पुढे विधानसभेत आघाडी झाली नसल्याने राष्ट्रवादीकडून विजय भांबळे यांना उमदेवारी देण्यात आली होती. आणि त्यावेळी त्यांनी जिंतूरमधून विजय सुद्धा मिळवला. आता पुन्हा २०१४ प्रमाणे या दोन नेत्यांमध्येच लढाई होणार असून, मात्र मागच्यावेळी काँग्रेसकडून लढणारे रामप्रसाद बोर्डीकर यावेळी भाजपकडून रिंगणात असणार आहे.