जिरी वेस्ली याला विजेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 04:45 AM2020-02-10T04:45:23+5:302020-02-10T04:45:42+5:30
बेलारूसच्या एगोर गेरासीमोव्ह याला नमवून झेक प्रजासत्ताकच्या जिरी वेस्ली याने रविवारी तिसऱ्या महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बेलारूसच्या एगोर गेरासीमोव्ह याला नमवून झेक प्रजासत्ताकच्या जिरी वेस्ली याने रविवारी तिसऱ्या महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर झालेल्या अंतिम फेरीत वेस्लीने आठव्या मानांकित एगोरचा ७-६ (२), ५-७, ६-३ असा पराभव करत विजेतेपद पटकावले. दुहेरी गटात इंडोनेशियाचा ख्रिस्तोफर रुंगकॅट व स्वीडनचा आंद्रे गोरसन ही जोडी विजेती ठरली. त्यांनी अंतिम फेरीत इस्त्राईलच्या जोनाथन एर्लिच व बेलारूसच्या आंद्रे वासिलेव्हस्की या तिसºया मानांकित जोडीवर ६-२, ३-६, १०-८ने मात केली.
२ तास १२ मिनिटे रंगलेल्या एकेरीच्या अंतिम लढतीत २६ वर्षीय वेस्लीने कडवी झुंज देत बाजी मारली. पहिल्या सेटमध्ये बाराव्या गेमपर्यंत ६-६ अशी बरोबरी झाल्याने हा सेट टायब्रेकपर्यंत ताणला झाला. टायब्रेकमध्ये वेस्लीने आक्रमक खेळ करत एगोरला कोणतीही संधी न देता सरशी साधत आघाडी घेतली. दुसरा सेटही चुरशीचा झाला. दहाव्या गेमअंती ५-५ अशी बरोबरी असताना अकराव्या गेममध्ये एगोरने जिरी वेस्लीची सर्व्हिस भेदली व बाराव्या गेममध्ये स्वत:ची सर्व्हिस राखत दुसरा सेट ७-५ असा जिंकून १-१ने बरोबरी साधली.
तिसºया व निर्णायक सेटमध्ये वेस्लीने लाजवाब खेळ केला. त्याने एगोरला कोणतीही संधी न देता प्रारंभीपासून आघाडी घेतली. हा सेट ६-३ असा सहजपणे जिंकून त्याने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.