राज्य सरकारची कोकणातून पर्यटक पळवा योजना, जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 05:42 PM2024-09-02T17:42:24+5:302024-09-02T17:49:16+5:30
Jitendra Awhad : वार्याच्या वेगाने जर पुतळा पडू शकतो तर, आपणही वाहून जाऊ, उडू किंवा पडू या भीतीने पर्यटकांनी कोकणाकडे पाठ फिरवली आहे, अशी खोचक टीका जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांवर केली आहे.
Jitendra Awhad : मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळल्याची घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन झाले होते. मात्र, अवघ्या आठ महिन्यात तो पुतळा कोसळल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. मात्र, ही दुर्घटना घडली, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली होती. त्या प्रतिक्रियेवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
वार्याच्या वेगाने जर पुतळा पडू शकतो तर, आपणही वाहून जाऊ, उडू किंवा पडू या भीतीने पर्यटकांनी कोकणाकडे पाठ फिरवली आहे, अशी खोचक टीका जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांवर केली आहे. "गणेशोत्सवाच्या काळात चाकरमानी आणि पर्यटकांमध्ये प्रचंड घबराट! अवघ्या ४५ किमी ताशी वार्याच्या वेगाने जर पुतळा पडू शकतो; तर, आपणही वाहून उडू किवा पडू या भीतीने पर्यटकांची कोकणाकडे पाठ !! राज्य सरकारची नवीन "कोकणातून पर्यटक पळवा योजना", असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर केले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात चाकरमानी आणि पर्यटकांमध्ये प्रचंड घबराट!
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 2, 2024
अवघ्या ४५ किमी ताशी वार्याच्या वेगाने जर पुतळा पडू शकतो; तर, आपणही वाहून उडू किवा पडू या भीतीने पर्यटकांची कोकणाकडे पाठ !!
राज्य सरकारची नवीन "कोकणातून पर्यटक पळवा योजना"
काय म्हणाले होते मुख्यमंत्री शिंदे ?
राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, "छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्या दैवत आहेत. हा पुतळा नौदलाकडून उभारण्यात आला होता. त्याठिकाणी ताशी ४५ किमी वेगाने एवढ्या जोरात वारा वाहत होता, त्यामुळे पुतळा पडला आणि नुकसान झाले. या घटनेमागील कारणे शोधून काढू आणि पुन्हा एकदा त्याच ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा उभारू."