“ही दडपशाही बघून हिटलरने सुद्धा शरमेने मान खाली घातली असती”
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 12:08 PM2020-02-27T12:08:31+5:302020-02-27T12:09:20+5:30
रविवारी सुरू झालेला दिल्लीत हिंसाचार आता थांबला आहे.
मुंबई :दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारावरून दिल्ली पोलिसांना खडेबोल सुनावणारे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांची मध्यरात्री बदली करण्यात आली. दरम्यान, या बदलीविरोधात राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
“भाजप नेत्यांच्या भडकाऊ भाषणावर कारवाई का केली नाही, असा दिल्ली पोलिसांना प्रश्न विचारणारे दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश मुरलीधर यांना त्यांच्या कर्तव्याचे बक्षीस म्हणून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. ही दडपशाही बघून हिटलरने सुद्धा शरमेने मान घातली असती”, असा खोचक टोला आव्हाडांनी भाजपला लगावला आहे.
तर रविवारी सुरू झालेला दिल्लीत हिंसाचार आता थांबला आहे. बुधवारी दिल्लीत हिंसाचाराची कोणतीही मोठी घटना घडलेली नाही, परंतु शहरात अजूनही भीतीचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाला आहे.